साधकांचे रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे केलेल्या ‘संजीवनी होमा’ची स्पंदने आरंभापासूनच पाताळात गेल्याने वाईट शक्तींनी आरंभापासून शेवटपर्यंत सूक्ष्म युद्ध करणे

‘सर्व साधकांचे त्रास न्यून होण्यासाठी, सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि विश्‍वकल्याणासाठी सप्तर्षींनी तमिळनाडूतील चेन्नई येथील जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून प्रतिदिन गुळवेल वनस्पतीच्या काष्ठांच्या आहुती देऊन ‘संजीवनी होम’ करण्यास सांगितले. कलियुगात संजीवनीप्रमाणे कार्य करणारी वनस्पती म्हणजे ‘गुळवेल वनस्पती’ आहे. होमामध्ये या वनस्पतीच्या आहुती दिल्यामुळे वातावरणाची शुद्धी होऊन मानवजातीचे रक्षण होणार असल्याचे सप्तर्षींनी सांगितले.

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हा होम करण्यात आला. या होमाचा मला जाणलेला सूक्ष्मातील परिणाम येथे देत आहे.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. होमाची स्पंदने स्वाधिष्ठानचक्रावर जाणवू लागणे; पण ती मूलाधारचक्रापर्यंत जाण्यामध्ये वाईट शक्ती अडथळे आणत असल्याचे लक्षात आल्याने नामजपादी उपाय शोधून ते करू लागणे

रात्री ८.१० : होमामध्ये पहिली आहुती दिल्यावर होमातून प्रक्षेपित झालेली स्पंदने मला माझ्या स्वाधिष्ठानचक्रावर जाणवू लागली. ही स्पंदने थंडाव्याच्या स्वरूपात होती.

रात्री ८.१५ : ‘अग्नीला आहुती स्वीकारतांना पुष्कळ आनंद होत आहे’, असे जाणवले.

रात्री ८.२० : ‘होमाची स्पंदने स्वाधिष्ठानचक्राच्या खाली मूलाधारचक्रापर्यंत जाण्यामध्ये वाईट शक्ती अडथळे आणत आहेत’, असे मला जाणवले. त्यामुळे मी आध्यात्मिक उपाय शोधले. त्यानुसार मी एका हाताचा तळहात स्वाधिष्ठानचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळहात नाकाच्या शेंड्यासमोर ठेवून ‘शून्य’ हा नामजप करू लागलो.

२. नामजपादी उपाय करू लागल्यावर वाईट शक्तींनी आक्रमणाचे स्थान पालटून वरून आक्रमण करणे आरंभ करणे, त्यांनी डोक्याभोवती आवरण आणणे, त्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होणे आणि त्यामुळे उपाय पालटावे लागणे

रात्री ८.३० : मी नामजपादी उपाय करू लागल्यावर वाईट शक्तींनी आक्रमणाचे स्थान पालटून वरून आक्रमण करणे आरंभ केल्याचे जाणवले. मला वरून त्रासदायक शक्तीचा दाब जाणवत होता. त्यामुळे डोक्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण झाले होते, तसेच श्‍वास घ्यायला त्रास होत होता. (होमात आहुती देणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही नंतर सांगितले की, तेव्हा त्यांनाही श्‍वास घ्यायला अडचण येत होती.) या त्रासावर मी नामजपादी उपाय शोधून त्याप्रमाणे माझा एक तळहात माझ्या डोक्यावर १ – २ सें.मी. अंतरावर उपडा ठेवला आणि त्यावर दुसरा तळहात पालथा टेकवून ठेवला अन् मी ‘निर्गुण’ हा नामजप करू लागलो. तळहातांच्या तशा रचनेमुळे एकाच वेळी खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने उपाय होत होते.

रात्री ८.३५ : नामजपादी उपायांमुळे वरून वाईट शक्तींनी निर्माण केलेला त्रासदायक शक्तीचा दाब आणि डोक्याभोवती आणलेले आवरण दूर झाले; पण अजून श्‍वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे मी पुन्हा उपाय शोधले आणि त्यानुसार नाकासमोर तळहात ठेवून ‘महाशून्य’ हा नामजप करू लागलो.

२ अ. वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणाला अटकाव करण्यासाठी खोक्यांचे उपायही करणे

रात्री ८.४० : मी एक बाजू उघडी असलेले रिकामे खोकेही उपाय होण्यासाठी ठेवले. रिकाम्या खोक्यातील पोकळीमध्ये त्रासदायक शक्ती खेचली गेल्याने आध्यात्मिक स्तरावर उपाय होतात. वरच्या दिशेकडून येणारी त्रासदायक शक्ती दूर करण्यासाठी मी होमामध्ये आहुती देणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मागे अर्धा मीटर अंतरावर, तसेच त्यांच्या समोर यज्ञकुंडाच्या पुढे १ मीटर अंतरावर एकेक रिकामा खोका त्याची उघडी बाजू वरच्या दिशेने करून ठेवला.

३. निरनिराळे नामजपादी उपाय केल्याने वाईट शक्तींचे आक्रमण होणे पुष्कळ न्यून होणे, वातावरणात हलकेपणा जाणवू लागणे आणि होमाची स्पंदने मूलाधारचक्रापर्यंत जाणे

रात्री ९ : या सर्व आध्यात्मिक स्तरांवरील उपायांमुळे वाईट शक्तींचे आक्रमण होणे पुष्कळ न्यून झाले आणि वातावरणात हलकेपणा जाणवू लागला. श्‍वासही मोकळेपणाने घेता येऊ लागला. तसेच होमाची स्पंदने मुलाधारचक्रापर्यंत गेल्याचे जाणवले. त्यामुळे माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

४. होमाचा परिणाम आरंभापासून पाताळाच्या दिशेने होत असल्याने वाईट शक्ती प्रतिकार करण्यासाठी होमाच्या आरंभापासूनच आक्रमण करू लागल्याचे लक्षात येणे

रात्री ९.०५ : वाईट शक्तींच्या आक्रमणाचे प्रमाण पुष्कळ न्यून झाल्याने होमातील अग्नीच्या ज्वाळाही वाढल्या. होमाचा परिणाम आरंभापासून खालच्या, म्हणजे पाताळाच्या दिशेने होत असल्याने वाईट शक्ती प्रतिकार करण्यासाठी होमाच्या आरंभापासूनच आक्रमण करू लागल्याचे लक्षात आले.

रात्री ९.१० : होम समाप्त झाला.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक