कोल्हापूर – शहरात १६ मेपासून कडक दळणवळण बंदी घोषित केल्यामुळे दूध आणि औषधे वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. महापालिकेने घरपोच भाजीपाला देण्यासाठी केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पहिले २ दिवस शहरातील काही भागात भाजी विक्रेते भाजी घेऊन येत होते. पोलिसांनी अडवणूक केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्रीसाठी शहरात येण्यास सिद्ध नाहीत.
दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर ४ दिवसांपूर्वी खरेदी केलेला भाजीपाला काही व्यापारी विक्री करत आहेत. खराब स्थितीतील आणि चढ्या दराने नागरिकांना भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा भाजीपाल्याचे मुख्य केंद्र समजला जातो. येथून विविध प्रकारची ताजी भाजी कोल्हापूर शहराला पुरवण्यात येते; मात्र कडक दळणवळण बंदीमुळे शेतकरी शहराकडे फिरकत नाहीत.