गडचिरोली येथे १३ नक्षलवाद्यांना ठार करणार्‍या ‘सी-६०’ पोलिसांचे जल्लोषात स्वागत !

थोड्याशा कारवाईने हुरळून आनंद साजरा करण्यापेक्षा संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने पोलीस आणि शासन यांनी ठोस कृती करावी !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

गडचिरोली – जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या कोटमी पोलीस साहाय्य केंद्राच्या क्षेत्रातील पैदी अरण्य परिसरात २१ मे या दिवशी पोलिसांच्या ‘सी-६०’ दलाने चकमकीत कसनसुर दलमच्या १३ जहाल नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये ६ पुरुष आणि ७ महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता. शौर्यपूर्ण कामगिरी करणार्‍या ‘सी-६०’ पोलिसांचे येथील पोलीस मुख्यालयात आगमन झाले, तेव्हा बॅण्ड पथकाच्या गजरात फटाके उडवत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठार झालेल्या १३ नक्षलवाद्यांवर ६० लाख रुपयांचे पारितोषिक शासनाने यापूर्वी घोषित केले होते. या नक्षलवाद्यांवर हत्या, जाळपोळ, चकमक असे विविध गुन्हे नोंद होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे येऊन या शौर्यपूर्ण कामगिरीविषयी पोलिसांचे कौतुक केले.