शेवगाव (जिल्हा नगर) येथे ‘गुरुदत्त’ संस्थेच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने किराणा साहित्याचे वाटप

गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करतांना ‘गुरुदत्त’ संस्थेचे साधक

शेवगाव (जिल्हा नगर), १७ मे (वार्ता.) – मागील २० वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सक्रीय असलेल्या ‘गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा’ संस्थेच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शेवगाव शहर आणि परिसरातील ६० गरजू आणि गरीब कुटुंबांना ५० सहस्र रुपये मूल्याच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांना अभिप्रेत असलेले कार्य ‘गुरुदत्त’ संस्थेकडून अविरत चालू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक तथा दत्त संप्रदायातील साधक श्री. गिरीश साठे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी आर्थिक योगदान दिले.

नगर रस्त्यावरील वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थान जवळच्या दादाजी प्रसादालय प्रांगणात साथरोग नियंत्रण कायदा नियमांचे पालन करून हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. दळणवळण बंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ‘गुरुदत्त’ संस्थेकडून मिळालेली किराणा मालाची छोटीशी भेट गरिबांसाठी सण गोड करणारी ठरली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अर्जुनराव फडके, श्री. हनुमानप्रसाद उपाख्य बाबुशेठ जोशी, श्री. पी.बी. शिंदे, श्री. ओमप्रकाश बाहेती, श्री. जगन्नाथ गोसावी, श्री. नीलेश रोकडे, डॉ. अमोल फडके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. मधुरा फडके यांनी केले.