इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेकडून निषेध

जगभरात कुठेही मुसलमानांवर आक्रमण झाले की, भारतातील मुसलमान निषेध नोंदवतात किंवा आंदोलन करतात. या वेळी ते देशाचे या घटनेसंदर्भातील धोरण काय आहे ? याचा विचार करत नाहीत किंवा ते धोरण सरकारने घोषित करेपर्यंत वाटही पहात नाहीत. त्यांच्यासाठी धर्मबांधव म्हणजेच धर्म आधी असतो आणि नंतर देश, असाच याचा अर्थ होत नाही का ?

पणजी, १५ मे (वार्ता.) – इस्रायलने अल्-अक्सा मशीद, जेरूसालेम, गाझा आणि पॅलेस्टाईनचा इतर भाग यांवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेच्या गोवा विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

‘जमात-इ-इस्लामी हिंद’ पत्रकात पुढे म्हणते, ‘‘इस्रायल आक्रमण करून आतंक पसरवून पॅलेस्टाईनचा भाग कह्यात घेऊन तेथे ज्यू लोकांची वस्ती वसवू पहात आहे. (असे सांगणारे पॅलेस्टाईनने आधी इस्रायलवर आक्रमण केले, हे का लपवत आहेत ? पहिल्यांना आपण खोड काढायची आणि नंतर आपल्याला मारले म्हणून भोकाड पसरायचे, हे धर्मांधांचे नेहमीचेच आहे ! – संपादक) पॅलेस्टीनी लोकांना भूमी सोडायला लावणे म्हणजे मानवी हक्कांची पायमल्ली आहे. इस्रायलने अल्-अक्सा मशिदीवर आक्रमण करून तेथील मुसलमानांना भयभीत करून सोडल्याने जगभरातील मुसलमानांना दु:ख झाले आहे. अल्-अक्सा मशीद हे मुसलमानांचे जगातील सर्वांत महत्त्वाचे तिसरे श्रद्धास्थान आहे. (तेथे हमासचे आतंकवादी राहिलेले धर्मांधांना चालतात ! – संपादक) मुसलमानांच्या धार्मिक भावना या मशिदीशी जोडलेल्या आहेत.’’