कोरोनाबाधित कुटुंबातील पशूधन सांभाळण्यासाठी सोलापूर येथे हंगामी पशू वसतीगृहाला प्रारंभ

सोलापूर – एखाद्या कुटुंबात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास किंवा घरातील सदस्य विलगीकरणात गेल्यास त्या कुटुंबातील पाळीव प्राण्यांच्या देखभालीचा प्रश्‍न प्रकर्षाने समोर येतो. कोरोनाबाधितांच्या घरातील दुभत्या आणि भाकड गोवंशियांसह श्‍वानांची असुविधा टाळण्यासाठी गोरक्षक, तसेच प्राणीमित्र यांनी हंगामी वसतीगृहाची अभिनव संकल्पना राबवली आहे.

१. शहरालगतच्या तुळजापूर रस्त्यावरील तेजामृत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोशाळा चालू करण्यात आली आहे. संबंधित गोवंशियांच्या मालकांनी स्वतः त्या गोशाळेत गोवंशियांना आणावे. संबंधित मालक किंवा त्यांचे कुटुंबीय अलगीकरणातून बाहेर आल्यानंतर जनावरांची स्वतः काळजी घेऊ शकतील, असा आत्मविश्‍वास आल्यानंतर त्यांना परत नेऊ शकतील. या काळात त्या गोवंशियांना सांभाळण्याचे दायित्व तेजामृत गोशाळाने घेतले आहे.

२. गोरक्षक देविदास मेटकरी यांच्यासह काही गोसेवक येथे पुढाकार घेऊन गोवंशियांची निगा राखत आहेत. येथे गोवंशियांना नियमित चारा-पाणी, औषधोपचार गोशाळेच्या वतीने करण्यात येत आहे. पशूपालकांनी स्वतः त्या ठिकाणी त्यांचे गोधन आणून सोडावे आणि स्वत:ची प्रकृती बरी झाल्यानंतर घेऊन जावे, असे आवाहन गोशाळेच्या वतीने करण्यात आले आहे. अशी अभिनव संकल्पना राबवणारी ‘तेजोमय चॅरिटेबल ट्रस्ट’ जिल्ह्यातील पहिली संस्था आहे.