कोरोनावर देशी दारूचा उपाय सांगणार्‍या शेवगाव (नगर) येथील आधुनिक वैद्याला नोटीस

डॉ. अरुण भिसे

शेवगाव (नगर) – कोरोनावर देशी दारू हा उपाय असल्याचे सांगत ५० हून अधिक रुग्ण बरे केल्याचा दावा करणारे डॉ. अरुण भिसे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच २४ घंट्यांच्या आत समक्ष येऊन खुलासा देण्याचे आदेश तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिले आहेत. डॉ. भिसे हे शालेय आरोग्य तपासणी पथकात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत आहेत. सध्या मनुष्यबळाअभावी त्यांना बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात थांबण्यास सांगण्यात आले आहे.

सामाजिक माध्यमावर एक संदेश प्रसारित झाला आहे. यात डॉ. अरुण भिसे यांच्या नावाने ‘देशी दारूचा काढा’ कोरोनाबाधित रुग्णांना दिल्यास रुग्ण बरा होतो, तसेच याला पुष्टी देतांना काही रुग्णांना आलेला अनुभव प्रसारित करण्यात आला आहे. यासह संशोधनाचा दाखलाही देण्यात आला आहे. काही कोरोनाबाधित रुग्ण त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशी दारूची मात्रा घेतल्याने कोरोनातून मुक्त झाल्याचे इतरांना सांगत आहेत. हा संदेश राज्यभर सामाजिक माध्यमातून पसरल्याने त्यावर विश्‍वास ठेवत अनेकांनी दोन घोट दारू घेणे चालू केल्याचे कळते.