रावणाचे उदात्तीकरण करणार्‍या श्रीलंकेतील धार्मिक कृती !

‘हिंदूंचा धर्मग्रंथ ‘रामायण’ यातील रावणाची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यानुसार रावण लंकेवर (सध्याच्या श्रीलंकेवर) राज्य करत होता. रावण हा फार शक्तीशाली राजा होता; मात्र त्याच्यातील तीव्र अहंभावामुळे दुसर्‍याची पत्नी पळवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. आपण सर्व जाणतो की, श्रीरामाने रावणावर विजय मिळवून धर्माची स्थापना केली. त्यानंतर बिभीषणाने श्रीलंकेवर राज्य केले. त्यामुळे श्रीलंकेला ‘बिभीषणभूमी’, असेही संबोधले जाते. त्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.   

१. दोन युगे संपली, तरी रावणाने लंकेवर राज्य केल्याचा इतिहास श्रीलंकेमध्ये विसरला गेला नाही. श्रीलंकेच्या काही भागांमध्ये रावणाला आदर्श ठरवून त्याची पूजा केली जात असल्याचेही आढळते.

२. नैसर्गिक आपत्तीपासून श्रीलंकेतील लोकांचे रक्षण होण्यासाठी करण्यात येणार्‍या यज्ञात देवतांसह रावणाचेही आवाहन करणे : नैसर्गिक आपत्तीपासून श्रीलंकेतील लोकांचे रक्षण व्हावे, यासाठी नुकतेच एका यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. हा यज्ञ ३०.१.२०१७ या दिवशी कोलंबोतील कोटेहेना येथे पार पाडला. ‘या यज्ञात अमूल्य वनस्पतींची आहुती देण्यात येणार असून सिद्ध लोकांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तो केला जात आहे’, असे जाहीर निमंत्रणात म्हटले होते. सर्वसाधारणपणे यज्ञाच्या वेळी नेहमी देवतांना आवाहन केले जाते. यज्ञाच्या ठिकाणी कार्यरत झालेले देवतेचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता यावे, यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना आवाहन केले जाते; मात्र या यज्ञाच्या वेळी प्रमुख पुरोहिताने आरंभी भगवान शिव आणि सिद्ध पुरुष यांना आवाहन केले. त्यानंतर त्याने प्रभु श्रीराम आणि सीता यांच्या समवेत रावण आणि मंदोदरी यांनाही त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आवाहन केले.

३. यज्ञाच्या ठिकाणी रावणाचे आवाहन म्हणजे लोकांमधील अहंभावी वृतीला अनुमती दिल्याप्रमाणे असल्याचे जाणवणे : यज्ञाच्या ठिकाणी रावणाला आवाहन करणे, म्हणजे लोकांची दिशाभूल करण्यासारखे आहे. रावण स्वत: ब्राह्मण असूनही त्याने धर्मपालन केले नाही. तो फार अहंभावी होता. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याची शक्ती हे एकत्रित असतात’, असे अध्यात्मात एक तत्त्व आहे. त्यानुसार आपण रावणाविषयी बोलतो, त्या वेळी त्याच्यातील रज-तम स्पंदने आकर्षित करत असतो. यज्ञाच्या वेळी त्याचे आवाहन करून आपण एका अहंभावी राजाला अनावश्यक निमंत्रित करतो. आपण ज्या देवतेची उपासना करतो, त्या देवतेचे तत्त्व आपण ग्रहण करत असतो; म्हणून रावणाचे आवाहन करणे, म्हणजे लोकांमधील अहंभावी वृतीला अनुमती दिल्याप्रमाणे आहे.

धार्मिक विधीद्वारे हिंदूच हिंदूंची दिशाभूल करतात. हे सर्व धर्मशिक्षणाच्या अभावाचे लक्षण आहे. हिंदूंनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून चैतन्यशक्ती ग्रहण करता येण्यासाठी त्यांच्या रुढी, धार्मिक कृती आणि आचार यांविषयी सतर्क अन् जागरूक रहाणे आवश्यक आहे.’

– एक साधिका (३०.३.२०१७)