जीवनावश्यक सेवा चालू राहील, हे पहाण्याचे मुख्यमंत्र्यांचे पंचायतींना आवाहन
पणजी, ४ मे (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, तसेच कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही वाढत असल्याने राज्यातील अनेक पंचायती आणि नगरपालिका यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वयंस्फूर्तीने दळणवळण बंदी लागू केली आहे. वास्तविक राज्यशासनाने १० मे या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध लादले आहेत; हे निर्बंध दळणवळण बंदीसारखेच असूनही याला दळणवळण बंदी, असे संबोधले नाही.
पंचायत आणि पालिका यांच्याकडून स्वयंस्फूर्तीने दळणवळण बंदी लागू करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंचायत आणि पालिका यांनी दळणवळण बंदी घोषित करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘पंचायत आणि पालिका यांनी केवळ शासनाने घोषित केलेले निर्बंध पाळल्यास त्यांचा उद्देश साध्य होणार आहे. पंचायत आणि पालिका यांनी दळणवळण बंदीमध्ये अत्यावश्यक सेवा बंद होणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. पंचायत आणि पालिका यांनी घोषित केलेल्या दळणवळण बंदीमुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कामावर जाऊ इच्छिणार्यांना पंचायत आणि पालिका यांनी रोखू नये किंवा नागरिकांवर अनावश्यक निर्बंध लादू नयेत.’’
जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने बंद, रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बसण्यास अनुमती नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कोरोनाचा कहर गडद होत चालल्याने आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन राज्यशासनाने राज्यात अतिरिक्त निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद रहातील. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा चालू रहाणार आहेत. उपाहारगृहांचे मालक घरपोच सेवा देऊ शकतील; मात्र उपाहारगृहांमध्ये ग्राहकांना बसून खाता येणार नाही. बाजार सामाजिक अंतर पाळून चालू ठेवता येणार आहे.’’
काही आमदार कामावर जाणार्या लोकांना अडवत आहेत
काही आमदार कामावर जाणार्या लोकांना अडवत आहेत. हे लोक कदाचित् रुग्णालये, औषधनिर्मिती आस्थापने आणि अन्य जीवनावश्यक सेवा यांच्याशी निगडित असू शकतात, असा आरोपही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
सांखळी नगरपालिका क्षेत्रात ५ ते १२ मेपर्यंत कठोर दळणवळण बंदी
सांखळी नगरपालिका मंडळाने ५ ते १२ मे या कालावधीसाठी पालिका क्षेत्रात कठोर दळणवळण बंदी घोषित केली आहे. या काळात सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू रहाणार आहेत. सोमवारचा आठवड्याचा बाजार बंद रहाणार आहे; मात्र औषधालये, पेट्रोल पंप, क्लिनिक आदी चालू रहाणार आहे.
रेईश-मागोस पंचायत क्षेत्रात १३ मेपर्यंत दळणवळण बंदी, चित्रीकरणावर निर्बंध
रेईश-मागोस पंचायत क्षेत्रात ५ ते १३ मे या कालावधीत दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. या काळात चित्रपट, मालिका आदींच्या चित्रीकरणावरही बंदी घालण्यात आली आहे.
- कुर्टी-खांडेपार पंचायतीने ५ ते १० मे या कालावधीत दळणवळण बंदी घोषित केली आहे.
- माजोर्डा-उतोर्डा-काल्टा पंचायत यांनी १६ मेपर्यंत दळणवळण बंदी घोषित केली आहे.
- वार्का, आके-बायस, कारमोणा अन् वेलसाव-पाळे पंचायत यांनीही दळणवळण बंदी घोषित केली आहे.
डिचोली येथे विधानसभा सभापतींच्या उपस्थितीत ५ दिवस दळणवळण बंदी घोषित
डिचोली शहरातही ९ मेपर्यंत दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. स्थानिक आमदार तथा गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर म्हणाले, ‘‘वास्तविक बुधवारी डिचोली येथे आठवड्याचा बाजार असतो; मात्र आम्ही शहरात पुढील ५ दिवस १०० टक्के दळणवळण बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने १ सहस्र आकडा पार केलेला आहे.’’
कुंकळ्ळी नगरपालिकेकडून आणखी निर्बंध लागू
कुंकळ्ळी नगरपालिकेने पालिका क्षेत्रात राज्यशासनाने लागू केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त आणखी निर्बंध घोषित केले आहेत. जीवनावश्यक साहित्याची दुकाने (केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत) सोडून अन्य सर्व दुकाने बंद रहातील.