परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ७.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्रीसत्यनारायण पूजेचे सूक्ष्म परीक्षण !
‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे ७.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘श्रीसत्यनारायणाची’ पूजा केली. या पूजेचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. फूलमिश्रित सुगंधी जलाने श्रीविष्णूच्या धातूच्या मूर्तीला अभिषेक करतांना मोगर्याचे एक फूल मूर्तीच्या हातामध्ये स्थुलातून अडकणे
श्रीविष्णूच्या धातूच्या मूर्तीतील ३ हातांमध्ये श्रीविष्णूने शंख, चक्र आणि गदा धारण केली होती अन् चौथा हात आशीर्वाद देणारा होता. ही षोडशोपचार पूजा चालू असतांना फूलमिश्रित सुगंधी जलाने मूर्तीला अभिषेक झाला. तेव्हा पाण्यामध्ये असणारे मोगर्याचे फूल मूर्तीच्या आशीर्वाद देणार्या हातामध्ये स्थुलातून अडकले. तेव्हा ‘श्रीविष्णूने पद्म धारण केले आहे’, असे दिसले.
२. मूर्तीच्या तोंडवळ्यावर स्मितहास्य दिसणे
मूर्तीमध्ये तारक तत्त्व कार्यरत झाल्यावर मूर्तीच्या तोंडवळ्यावर स्मितहास्य दिसले. तेव्हा श्रीविष्णूच्या श्रीसत्यनारायण रूपाने प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद दिल्याचे जाणवले.
३. श्रीसत्यनारायण देवाला वाहिलेल्या मोगर्याच्या फुलांमुळे सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
श्रीसत्यनारायण देवाला वाहिलेल्या मोगर्याच्या फुलांमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा भाव कार्यरत असल्यामुळे मोगर्याची फुले सूक्ष्मातून निळसर रंगाची दिसत होती. या फुलांतून वातावरणात प्रक्षेपित होणार्या भावतरंगामुळे वातावरण भावमय झाले होते. या भावतरंगांनी प्रथम मूर्तीच्या चरणांना स्पर्श केला. त्यामुळे मूर्ती जागृत होऊ लागली आणि नंतर भावतरंगांनी मूर्तीच्या अनाहतचक्राला स्पर्श केल्यामुळे मूर्तीमध्ये विष्णुतत्त्व कार्यरत झाले.
४. महाजलाभिषेकाच्या वेळी आलेली अनुभूती
महाजलाभिषेकाच्या वेळी मूर्तीतून वातावरणात शीतल लहरींचे प्रक्षेपण होऊन ऐन दुपारी विधी चालू असूनही सर्वांना गारवा जाणवला.
५. पंचामृत स्नानानंतर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
पंचामृत स्नानानंतर ताम्हणात पांढर्या रंगाचे पंचामृत पसरले होते आणि त्याच्या मधोमध श्रीविष्णूची मूर्ती स्थुलातून उभी होती. पूजेतील ‘महाविष्णूची धातूची मूर्ती क्षीरसागरात उभी आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. तेव्हा क्षीरसागरात आनंदाच्या लाटा उसळतांना जाणवल्या. पंचामृत स्नानाच्या वेळी श्रीविष्णूच्या मूर्तीमध्ये चैतन्याचे प्रमाण वाढल्यामुळे ती सोनेरी रंगाची दिसत होती.
६. पूजेतील केळीच्या खांबांचे जाणवलेले वैशिष्ट्य
पूजेतील चौरंगाच्या पायाला बांधलेले ‘केळीचे खांब हे समृद्धीचे प्रतीक आहेत’, असे जाणवले. त्यांच्याकडून वातावरणात तारक शक्ती, सात्त्विकता आणि सगुण चैतन्य यांचे प्रक्षेपण झाले.
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळे वातावरण दैवी बनणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून वातावरणात अनुक्रमे तारक अन् मारक लक्ष्मीतत्त्व प्रक्षेपित होऊन वातावरण दैवी बनले. या वातावरणात लक्ष्मीलोकातील वातावरणाची ७ टक्के इतकी स्पंदने कार्यरत झाली होती. त्यामुळे पूजेला उपस्थित असणार्या सर्वांना चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती आली.
८. श्रीविष्णूच्या मूर्तीला १०८ तुळशीपत्रे वाहिल्यामुळे मूर्ती जागृत होणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीविष्णूच्या मूर्तीच्या चरणांवर १०८ तुळशीपत्रे वाहिली. तुळशीमध्ये असणार्या विष्णुतत्त्वाचा स्पर्श श्रीविष्णूच्या चरणांना होऊन चरणांद्वारे विष्णुतत्त्व मूर्तीमध्ये संक्रमित झाले आणि मूर्तीमध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व कार्यरत झाले. त्यामुळे स्थुलातून पितळ्याची विष्णुमूर्ती सूक्ष्मातून निळसर रंगाची दिसत होती. त्यामुळे वातावरणात आल्हाददायक स्पंदने प्रक्षेपित झाले.
९. भावपूर्ण पूजनामुळे वातावरणातील सात्त्विकता वाढून ब्राह्ममुहूर्ताप्रमाणे वातावरण निर्माण होणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सत्यनारायणदेवाची पूजा भावपूर्णरित्या केल्यामुळे वातावरणातील सात्त्विकता वाढून ब्राह्ममुहूर्ताप्रमाणे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सर्वांना वातावरणातील चैतन्य मिळून ताजेतवाने वाटत होते.
१०. सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी श्री सत्यनारायणाची कथा भावपूर्णरित्या सांगणे
अ. सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी श्रीसत्यनारायण कथेचे भावपूर्णरित्या कथन केले. तेव्हा ही कथा सद्गुरुद्वयी, संत आणि साधक यांनी भावपूर्णरित्या श्रवण केली. त्यामुळे सर्वांची उपासनाकांडाद्वारे साधना होऊन सर्वांवर सत्यनारायणाची कृपा होऊन साधकांचे मानसिक ताप आणि त्यांच्या साधनेतील आध्यात्मिक स्तरावरील समस्त अडथळे दूर झाले. अंतर्बाह्य हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सत्यनारायणदेवाने सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले.
आ. सत्यनारायण कथेच्या आरंभी आणि शेवटी वातावरणात अष्टगंधाचा सुगंध दरवळला.
कृतज्ञता : ‘देवा, तुझ्या कृपेनेच श्री सत्यनारायण पूजेला उपस्थित राहून त्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळेलेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१९)
सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात. |