पुणे – संयम, चिकाटी, धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्लेषणात्मकता, संशोधनात्मक वृत्ती, प्रतिभा आणि वक्तृत्व या कलागुणांनी विद्यार्थ्यांनी जीवनात उतरायला हवे. तसेच ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग ही सूत्रे कायम लक्षात ठेवावीत, असा सल्ला ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला. ‘डॉ. विश्वनाथ कराड एम्.आय.टी. विश्वशांती विद्यापिठा’च्या वतीने कीर्तनकार प्रज्ञाचक्षू ह.भ.प. गणपत महाराज जगताप यांना ‘डी.लिट्’ (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय पदवी, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संगणक तज्ञ आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एम्.आय.टी.चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, विद्यापिठाचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरु डॉ. एन्.टी. राव, प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद पांडे आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे उपस्थित होते.
महान व्यक्तींच्या गुणांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा ! – डॉ. माशेलकर
ह.भ.प. गणपत महाराज हे नेत्रहीन असूनही त्यांनी समाजाला आणि देशाला दृष्टी दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे सिद्ध केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून शिवचरित्राशी एकरूप होऊन तपश्चर्या केली. अशा महान व्यक्तींच्या गुणांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा.
संतांच्या ग्रंथांचे अध्ययन केल्याने जीवनाचा उद्धार होतो ! – डॉ. विजय भटकर
संतांच्या ग्रंथांचे अध्ययन करणे जीवनात महत्त्वाचे आहे. त्यामुळे जीवनाचा उद्धार होतो. ह.भ.प. जगताप महाराज यांना ‘डी.लिट्’ बहाल करून नवा पायंडा घातला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’चे कार्य युवकांच्या मनामनांत पेरले आहे.
कुणाचा राग, द्वेष करू नका तर सर्वांवर प्रेम करा ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
‘सर्वांनी शिवचरित्राचे स्वतः चिंतन आणि मनन करावे. कोणाचाही कधी राग, द्वेष करू नका. सर्वांवर प्रेम करा’, हा शिवचरित्राचा संदेश आहे, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.
‘प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतांनाही विद्यापिठाकडून पदवी बहाल करण्यात आली आहे, हे समर्थ कृपेमुळे शक्य झाले’, असे ह.भ.प. गणपत महाराज यांनी सांगितले, तर ‘सद्गुणांची पूजा हीच ईश्वराची पूजा होय. प्रज्ञाचक्षू गणपत महाराज जगताप आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या हेतूने हा सन्मान करण्यात आला’, असे डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एन्.टी. राव यांनी केले. प्राध्यापक गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.