नागपूर येथे मनरेगाचे आयुक्तालय आगीत बेचिराख

धारिका, दस्तावेज, संगणक यांची पुष्कळ हानी !

नागपूर – येथील सिव्हिल लाईन्स परिसरात प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात २ मे या दिवशी सकाळी मोठी आग लागली. या आगीमध्ये मनरेगाचे राज्य आयुक्तालय पूर्णपणे बेचिराख झाले असून येथील राज्यभरातील धारिका (फाईल), दस्तावेज आणि संगणक यांची मोठी हानी झाली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये (मुंबई आणि मुंबई उपनगर हे २ शहरी जिल्हे वगळून) ग्रामीण भागात मनरेगा योजनेची जी काही कामे होतात, त्या संदर्भातील सर्वांत मोठे आयुक्त कार्यालय नागपूर येथे आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या ६ गाड्या तातडीने घटनास्थळी पोचल्या; मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याआधीच कार्यालयाची मोठी हानी झाली होती. अग्नीशमन दलाच्या प्रयत्नामुळे ही आग ८ मजल्यांच्या प्रशासकीय इमारतीच्या इतर मजल्यांवर पसरली नाही.