दायित्व चोख पार न पाडल्याने पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील २२ पोलिसांचे स्थानांतर !

दायित्व चोख पार न पाडणार्‍यांचे स्थानांतर करून त्यांच्यात पालट होणार आहे का ? अशा पोलिसांना शिक्षा करून पुन्हा काम करण्याची संधी देणे आणि असे वागणे अन्य पोलिसांकडून होऊ नये, यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

पुणे, २ मे – रेल्वे स्थानकात परप्रांतीय प्रवाशांकडील पैसे बळजोरीने काढून घेण्याचे प्रकार होत असल्यामुळे पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अनुमाने २२ कर्मचार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांवर सोपवलेले दायित्व त्यांनी चोख पार न पाडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांच्या स्थानांतरानंतर पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ५० नवीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी संबंधित २२ कर्मचार्‍यांचे पुढील आदेशापर्यंत पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालयात स्थानांतर केले आहे.

वायसे पाटील यांनी सांगीतले की, प्रवाशांच्या लुटीशी लोहमार्ग पोलिसांचा संबंध नाही; मात्र रेल्वे स्थानकात विविध गुन्ह्यांत यापूर्वी २३ तोतया पोलिसांवर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. हेच लोक किंवा अशा प्रवृत्ती वारंवार गुन्हे करत असण्याची शक्यता आहे. या प्रकारांना अटकाव करू न शकल्याने २२ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

प्रवाशांना त्रास होत असल्याचा कोणताही प्रकार भविष्यात आढळून आल्यास, या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांचा कसुरी अहवाल राज्य सरकारला पाठवून, त्यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी तंबी सदानंद वायसे पाटील यांनी दिली.