…अखेर ज्याची भीती होती तेच झाले !
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मोठ्या उत्साहात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांसह सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी येथे चढाओढीने सभा घेतल्या. या सभांमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात मतदान आणि प्रचाराचा हा कार्यक्रम चालू होता. अखेर ज्याची भीती होती तेच झाले. मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय शिंदे, अमोल मिटकरी, भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले. या नेत्यांनी ज्या ज्या गावात सभा घेतल्या होत्या, ती गावे आता कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ (संवेदनशील क्षेत्र) झाली आहेत. १७ एप्रिल या दिवशी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतरच्या ४-५ दिवसांत या मतदारसंघामध्ये १ सहस्र कोरोना रुग्णांची भर पडली, तसेच पंढरपूर येथे प्रतिदिन ८ ते १० जणांचा मृत्यू होत आहे.
संकलन : वर्षा कुलकर्णी, सोलापूर
मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावे झाली कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ !
पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या सभांमध्ये कोरोनाच्या दृष्टीने सामाजिक अंतर ठेवणे, ‘मास्क’चा वापर करणे यांतील कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्याची परिणती म्हणून मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, भोेसे, लवंगी ही गावे कोरोनाची ‘हॉटस्पॉट’ ठरली आहेत.
स्वत:चे दायित्व झटकून उलट नागरिकांनाच उत्तरदायी ठरवले जाणे !
पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर पंढरपूर येथील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. ‘या परिस्थितीला उत्तरदायी येथील नागरिकच आहेत’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चे दायित्व झिडकारून हात वर केले. पुणे येथे अजित पवार पत्रकारांना म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाने निवडणूक लावली म्हणून तेथे प्रचाराला गेलो. निश्चित केलेल्या नियमावलीप्रमाणे सभा आयोजित करावी, असे आम्ही सांगितले होते; मात्र काही जण ‘मास्क’ न लावता तोंडाला रूमाल लावत होते. सभांमध्ये नागरिकांनीच कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही, त्यांना आम्ही काय बोलणार ?’’ प्रत्यक्षात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतांना लोकप्रतिनिधी या नात्याने या नियमांचे उल्लंघन होणार नाही, या दृष्टीन त्यांनीही प्रयत्न करणे आवश्यक होते, असे वाटते.
मंगळवेढा येथे सध्याची कोरोनाची स्थिती !
मंगळवेढा तालुक्यात सध्या कोरोनाचे ३ सहस्रांहून अधिक बाधित रुग्ण आहेत. ही आकडेवारी केवळ चालू म्हणजेच एप्रिल मासातील असल्याने ती वाढण्याची शक्यता आहे. मंगळवेढा तालुक्यातील २५ गावांत कोरोनाचा कहर चालू आहे.
धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने ही स्थिती निर्माण झाली असती तर ?
पंढरपूर येथे एकादशीच्या निमित्ताने एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, तर लोकप्रतिनिधींनी सर्व परिस्थितीचे खापर कार्यक्रमाचे आयोजन करणारे धार्मिक व्यवस्थापक आणि भाविक यांवर फोडायला मागे-पुढे पाहिले नसते, तसेच संबंधितांवर कठोर कारवाईही केली असती. येथे परिस्थिती उलट असून निवडणूक आयोग आणि प्रशासकीय अधिकारी यांनी केवळ गुन्हे नोंदवण्याचा सोपस्कार पार पाडण्याविना काहीही केलेले नाही.
कुणाच्या मागे धावायचे, ते आपणच ठरवा !
सध्याचे लोकप्रतिनिधी नागरिकांचे दायित्व झिडकारून त्यांना कोरोना महामारीच्या संकटात ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि निर्माण झालेल्या गंभीर स्थितीला नागरिकांनाच उत्तरदायी ठरवतात, अशांच्या मागे धावायचे कि परम दयाळू असलेल्या अन् सर्वांची नि:स्वार्थपणे काळजी घेणार्या परमेश्वराची भक्ती करायची ? हे आपणच ठरवायला हवे.