कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

साधकांना सूचना

(श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ

‘मार्च २०२० पासून ११ एप्रिल २०२१ पर्यंत भारतात १ कोटी ३३ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये १ लाख ६९ सहस्रांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग मागील वर्षापेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात आवश्यक तितके ‘बेड’ (खाटा) न मिळणे, व्हेन्टिलेटरची सोय असलेल्या खाटा अपुर्‍या असणे, इतकेच नव्हे, तर ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडर यांची टंचाई भासणे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक रुग्णालयांच्या बाहेर नातेवाइकांना आपल्या रुग्णांना जागा मिळावी, यासाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे. नागरिकांकडे पैसे असूनही उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरू नये, तसेच त्यापासून नागरिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे, यासाठी शासन-प्रशासनाकडून विविध माध्यमांतून वेळोवेळी प्रबोधन करण्यात येत आहे; मात्र नागरिकांकडून या सूचनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या  संसर्गाची भयानक परिस्थिती लक्षात घेता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अजून महत्त्वाचे ठरते.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्येही आरोग्याच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी, यासाठी अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदीय, होमिओपॅथी या वैद्यकीय शाखांनुसार आवश्यक त्या सूचना यापूर्वी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार कोरोना महामारीपासून संरक्षण होण्यासाठी वैद्यकीय सूचनांचे, उदा. मुखपट्टी (मास्क) चा वापर करणे, दोन व्यक्तींमध्ये ६ फूट अंतर ठेवणे, वेळोवळी हात साबणाने स्वच्छ करणे किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करणे, अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडणे, अनावश्यक गर्दी टाळणे, आदींचे काटेकोर पालन करावे.

या आपत्तीचा सामना करण्यासाठी मनोबल आणि आत्मबल वाढावे, यासाठी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार स्वयंसूचना सत्रे कशी करावीत ?, याची उदाहरणासहित माहिती यापूर्वी ‘सनातन प्रभात’मधून देण्यात आली आहे. त्याचा लाभ साधकांसह हितचिंतक, वाचक यांना झाल्याचे लक्षात आले. याशिवाय आत्मबल वाढण्यासाठी ‘दुर्गा-दत्त-शिव’ यांचा नामजप करावा आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेल्या ३ मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र २१ वेळा म्हणावा. स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी वेळोवेळी प्रार्थना करावी.

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्‍वराला अपेक्षित आहे. आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे. आपत्काळानंतर ईश्‍वरी राज्य अर्थात् रामराज्य अवतरणार आहे, असेही संतांनी आश्‍वस्त केले आहे. हे लक्षात घेता आपत्काळात तरून रामराज्यातील प्रजा होण्यास पात्र होण्यासाठी साधना म्हणून वरील सूचनांचे पालन व्हावे, यासाठी ईश्‍वरचरणी शरण जाऊन प्रयत्न करूया !’

-श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२१)