फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.४.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात रहाणारे सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या सेवेत असणार्या साधिका कु. विशाखा चौधरी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पू. सीताराम देसाई यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार
१. आश्रमात रहायला आल्यावर नवीन साधकांशी मनमोकळेपणाने बोलणे
‘पू. देसाईआजोबा रामनाथी आश्रमात पहिल्यांदा रहायला आले. तेव्हा त्यांचा स्वभाव अबोल आणि शांत होता. तेव्हा ते अगदी अल्प, म्हणजे गरजेपुरतेच बोलायचे. आता ते खोलीत येणार्या नवीन साधकांशी पूर्वीपासून ओळख असल्याप्रमाणे मनमोकळेपणाने बोलतात.
२. विश्रांती घेण्यास सांगितल्यावर मिस्किल उत्तर देणारे पू. देसाईआजोबा !
पू. देसाईआजोबा ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. कधी मी त्यांना म्हणते, ‘‘पू. आजोबा, तुमचे पाय दुखत असतील. तुम्ही आता विश्रांती घ्या.’’ तेव्हा ते म्हणतात, ‘‘अगं, अजून माझे वयच काय आहे ? नुसते १८ (८१ च्या उलट) वर्षे आहे. तुला काय वाटते, ‘मी म्हातारा झालो ?’’ त्यांचे बोलणे ऐकून मलाही उत्साह येतो.
३. पू. देसाईआजोबांमध्ये येत असलेली विष्णुतत्त्वाची अनुभूती
अ. पू. आजोबांची सेवा करतांना कधी कधी ‘ते बाल राम आहेत आणि मी बाल रामाची सेवा करत आहे’, असे मला वाटते.
आ. एकदा मी पू. आजोबांना त्यांची साखळी घालून देत होते. तेव्हा क्षणभरासाठी मला ‘ते साक्षात् बालाजी आहेत’, असे वाटले.
४. पू. आजोबा झोपलेले असतांना माझे ‘मन स्थिर आणि निर्विचार होते’, असे मला वाटते.
५. शेतात कष्ट करूनही पू. आजोबांचे हात आणि तळपाय लहान बालकाप्रमाणे मऊ असणे
पू. आजोबांची शेती असल्याने त्यांचे आयुष्य डोंगरावर आणि रानात गेले आहे, तरीही त्यांचे हात आणि तळपाय लहान मुलांसारखे मऊ आहेत. सहसा शेतात कष्ट करणार्या व्यक्तींचे हात आणि तळपाय कडक असतात; पण पू. आजोबांचे हात आणि तळपाय २ – ३ वर्षांच्या बालकांप्रमाणे मऊ आहेत.
६. खोलीतील सेवा झाल्यावर येणारी अनुभूती
पू. आजोबांच्या खोलीतील सेवा झाल्यावर माझा हात मऊ होतो आणि साधारण ३० मिनिटांपर्यंत तसाच रहातो. त्या वेळी मला सारखे माझ्या हाताचा स्पर्श अनुभवासा वाटतो.
७. पू. आजोबांच्या बोलण्यातून ‘कपड्याप्रमाणे मनाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया वेळेवर केली नाही, तर ते शुद्ध करण्यास अधिक वेळ द्यावा लागेल’, याची जाणीव होणे
पू. आजोबांच्या पांढर्या कपड्यांवर पूर्वी पडलेला एक डाग होता. मी त्यांना म्हणाले, ‘‘सोडा आणि साबण घालून मी हा कपडा स्वच्छ धुते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘कपडा चांगला घासावा लागेल. कपड्यांवरचे डाग वेळच्या वेळी घासले, तरच ते स्वच्छ होतात. आता एकदम सगळे स्वच्छ करायला गेलीस, तर ते पूर्ण स्वच्छ होणार नाहीत आणि तुला पुष्कळ वेळ द्यावा लागेल.’’
या प्रसंगावरून ‘आपण आपल्या मनाची प्रक्रिया वेळेवर केली, तर ते शुद्ध राहील, नाही तर मन दूषित होईल आणि मनाला स्वच्छ करायला वेळ द्यावा लागेल’, हे मला शिकायला मिळाले.
‘हे गुरुदेवा, मला ‘पू. देसाई आजोबांमधील गुण शिकता येऊ देत’, अशी आपल्याा चरणी प्रार्थना आहे.’
– कु. विशाखा चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |