डॉ. जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांच्या मुखवट्यामागील पाद्री

डॉ. जॉनरोस ऑस्टिन जयलाल

डॉ. जॉनरोस ऑस्टिन जयलाल हे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ या भारतातील पाश्‍चात्त्य वैद्यक पदवीधरांच्या सर्वांत मोठ्या खासगी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या दोन मुलाखती वादात सापडल्या आहेत. पैकी ‘ख्रिश्‍चॅनिटी टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोविडच्या जागतिक साथीविषयी डॉ. जयलाल म्हणाले, ‘‘मी पहातो आहे की, अनेक बंधने आणि अडचणी, तसेच अनेक ठिकाणी शासनाचे नियंत्रण असूनही ख्रिस्ती पंथ वाढतांनाच दिसत आहे.’’ या मुलाखतीच्या अनुषंगाने ते वृत्तपत्र कोविडच्या साथीचे वर्णन ‘चंदेरी किनार असलेला काळा ढग’ असे करते. याचा नेमका अर्थ आकाशातील त्यांच्या देवालाच ठाऊक असावा.

कोरोना काळात केलेल्या साहाय्याला धार्मिक रंग देणे घृणास्पद !

वैद्य परीक्षित शेवडे

कोविडच्या साथीचे वर्णन करतांना डॉ. जयलाल म्हणतात, ‘‘संसर्गित होणार्‍यांमध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. गरिबांच्या दृष्टीने मात्र हे मोठे संकटच होते; मात्र बहुतेक वेळा स्थानिक चर्चने साहाय्य केल्यामुळेच त्यांना लाभ झाला. बहुतांशी चर्चने अशा लोकांना साहाय्य केल्यामुळेच त्यांची या काळात गुजरण झाली.’’

संपूर्ण देश नव्हे, तर जगच रोगराईच्या या संकटाचा सामना करत असतांना तिथे कुणीही देऊ केलेल्या साहाय्याला धार्मिक रंग देणे, हे केवळ आक्षेपार्ह नसून घृणास्पदही आहे. जात, पंथ, धर्म इतकेच नव्हे, तर आर्थिक परिस्थितीही बाजूला सारत या संपूर्ण कालावधीमध्ये ‘माणसांनी माणसांना’ साहाय्य केल्याचे चित्र भारतात सर्वत्र दिसले. एखादी सुशिक्षित व्यक्ती इथेही धार्मिक रंग देत असल्यास त्याहून मोठे दुर्दैव ते काय ?

डॉ. जयलाल यांनी ‘कोरोना साथीमध्ये ख्रिस्ती पंथानेच जगाला तारले’, असे भासवण्याचा प्रयत्न करणे

Haggai international ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तर याहून अधिक धक्कादायक विधाने डॉ. जयलाल यांनी केली आहेत. आजवर जगाने अनुभवलेल्या साथीच्या रूपांतून जणूकाही ख्रिस्ती पंथानेच जगाला तारल्याचे भासवत ते या मुलाखतीमध्ये सांगतात. ‘या विषाणूमुळे लोकांच्या मनामध्ये ही भीती आणि समज निर्माण झाला की, आपल्यापेक्षा शक्तीमान असे या जगात निश्‍चित काहीतरी आहे. ज्या वेळी कुष्ठरोग, कॉलरा किंवा अन्य कुठल्याही साथीच्या रोगाने जगाची विल्हेवाट लावली, त्या वेळेला ख्रिस्ती डॉक्टर्स आणि चर्च यांनीच या रुग्णांना ख्रिस्ती कारुण्याचा भाव दाखवत साहाय्य केले. ‘गॉस्पेल’विषयी (ख्रिस्त्यांचा ग्रंथ) जनतेसमोर प्रबोधन करण्याची अशी संधी या विषाणूने उपलब्ध करून दिली आहे; जेणेकरून अगदी धर्मनिरपेक्ष संस्थांमध्येही गॉस्पेलचा संदेश सामायिक केला जाऊ शकतो.’

डॉ. जयलाल यांच्या या मताचा नेमका अर्थ काय घ्यावा ? कुठलाही साथीचा रोग धर्मप्रचाराची संधी असू शकतो का ? महत्त्वाचे म्हणजे या मुलाखतीवरून सामाजिक माध्यमांमध्ये गदारोळ झाल्यानंतर डॉ. जयलाल यांची मुलाखत संबंधित संकेतस्थळावरून काढण्यात आली आहे.

डॉ. जयलाल यांनी ख्रिस्ती डॉक्टरांना ख्रिस्ती उपचारांचा अवलंब करण्याविषयी सुचवणे

‘ख्रिश्‍चॅनिटी टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. जयलाल यांनी असेही म्हटले आहे, ‘‘आयसीयू’मध्ये किंवा अधिक संक्रमण असलेल्या विभागांमध्ये काम करण्यास सगळेच आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) सिद्ध नव्हते. अशा स्थितीत ख्रिश्‍चन डॉक्टर्स समोर आले आणि त्यांनी अशा विभागांमध्ये वैद्यकीय सेवा अन् साहाय्य केले.’’ वैद्यकीय व्यावसायिकांनाही त्यांचा पंथ-जात-धर्म यांवरून विभागणे सुन्न करणारे आहे. याच मुलाखतीमध्ये डॉ. जयलाल यांनी पुढे असेही म्हटले आहे, ‘‘एक ख्रिस्ती डॉक्टर म्हणून मला रुग्णाचे मानसिक आणि स्वास्थ्य (शारीरिक), तसेच आध्यात्मिक स्वास्थ्य यांविषयी काळजी घेणे, हे माझे कर्तव्य दिसते. अधिकाधिक ख्रिस्ती डॉक्टर्सनी धर्मनिरपेक्ष संस्था, मिशनरी संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालये येथे काम करणे आवश्यक आहे. मी शस्त्रक्रिया विभागात प्राध्यापक म्हणून एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. ख्रिस्ती उपचारांचा अवलंब करण्यास ही मला उत्तम संधी असल्याचे दिसते.’’

एखाद्या वैद्यकीय व्यावसायिकाला आपल्या धर्माविषयी आदर असणे वा तो सश्रद्ध असणे याविषयी कुणालाही आक्षेप असण्याचे काही कारण नाही; मात्र वरील वक्तव्य वाचल्यानंतर नेमक्या कुठल्या ‘ख्रिस्ती रोगनिवारक उपायांचा’ उपयोग रुग्णांवर करणे डॉक्टरांना अपेक्षित आहे ? ही शंका मनामध्ये निश्‍चितच उभी रहाते. अशाच प्रकारचे ’प्रयोग’ मदर तेरेसा यांनी केल्याचे सर्वश्रुत आहेच !

डॉ. जयलाल यांनी केंद्रशासन, संस्कृत, हिंदुत्व आणि आयुर्वेद यांच्याविषयी व्यक्त केलेला द्वेष

या मुलाखतीत त्यांनी उपरोल्लेखित Haggai संकेतस्थळावरून काढलेल्या मुलाखतीतील स्वतःच्या विधानाविषयी डॉ. जयलाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘केंद्रामध्ये हिंदु राष्ट्रवादी शासन असल्यामुळे त्यांना ‘मॉडर्न मेडिसिन’ला ‘पाश्‍चात्त्य वैद्यक’ म्हणत नष्ट करायचे आहे. वर्ष २०३० पर्यंत शुद्ध पाश्‍चात्त्य वैद्यक नावाचा कुठलाही भाग भारतामध्ये न रहाता ‘मिक्सोपॅथी’ सर्वत्र अवतरेल.’ आपल्या विधानाविषयी सविस्तर स्पष्टीकरण देत असतांना डॉ. जयलाल यांनी स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. या स्पष्टीकरणात पाश्‍चात्त्य वैद्यक हेच जाणून एकमेव पुरावा सिद्ध वैद्यक असल्याचा आव त्यांनी आणलेला दिसतो. ते म्हणतात, ‘‘केंद्रशासन हे हिंदुत्वनिष्ठ असल्यामुळे त्यांचा विश्‍वास आयुर्वेद नामक चिकित्सापद्धतीवर आहे. वर्ष २०३० पर्यंत ‘एक देश, एक वैद्यक’ या संकल्पनेअंतर्गत सर्वत्र ‘मिक्सोपॅथी’ अवतरेल. त्यानंतर केंद्रशासनाला एकच धर्म आणायचा असेल. त्यांना संस्कृत भाषेच्या सक्तीने साध्य करण्याची इच्छा असेल, जी पूर्वीपासूनच हिंदु तत्त्वांवर आधारलेली भाषा आहे. पर्यायाने संस्कृत भाषेची सक्ती भारतातील लोकांच्या मनावर केली जाईल.’’

डॉक्टरच्या मुखवट्यामागील पाद्री !

आम्ही स्वतः मिश्रवैद्यक संकल्पनेच्या विरोधातच आहोत; मात्र यानिमित्ताने ओढाताण करून संस्कृत, हिंदुत्व आणि आयुर्वेद यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा डॉ. जयलाल यांचा प्रयत्न तिरस्करणीय आहे. केंद्राला धर्मसक्ती करायची आहे, हे विधान तर हास्यास्पद आहे ! एखाद्या सुशिक्षित व्यक्तीने देशाच्या राज्यघटनेच्या रचनेवर इतका अविश्‍वास दाखवणे, हे दुर्दैवी आहे. या मुलाखत प्रकरणावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने सारवासारव केली असली, तरी संस्थेशी संबंधित असणार्‍या डॉ. अमित थडानी यांच्यासारख्या तज्ञांनी या धर्मांध विधानांचा जाहीर समाचार घेतलेला आहे. हे प्रकरण अधिक चिघळू नये, याकरता जयलाल यांनी परिपत्रक काढत स्वतःचे शब्द चुकीच्या संदर्भात वापरले जात असून तसे करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा चेतावणीही दिली आहे; पण तसे करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या वक्तव्याविषयी स्वतःच काळजी घेणे अधिक उचित होते किंवा यानिमित्ताने अगदी नकळत त्यांच्या पोटातले ओठांवर आले आणि डॉक्टरच्या मुखवट्यामागील पाद्य्राचा (पास्टरचा) चेहरा लोकांसमोर आला, इतकेच म्हणता येऊ शकेल.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली (साभार : दैनिक ‘तरुण भारत’, बेळगाव)