परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे मुंबई येथील सेवाकेंद्रात दर्शन घेतांना साधकांना आलेल्या विविध अनुभूती

२५.३.२०१९ या दिवशी मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांची (गुरुपादुकांची) स्थापना करण्यात आली. त्यांच्या दर्शनाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. पंचतत्त्वांशी संबंधित अनुभूती

१ अ. पृथ्वीतत्त्वाशी संबंधित अनुभूती

१ अ १. ध्यानमंदिरात प्रवेश केल्यावर चंदनाचा सुगंध येणे, गारवा जाणवणे आणि गुरुपादुकांमधून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसणे : ‘मी ध्यानमंदिरात प्रवेश केल्यावर मला चंदनाचा सुगंध आला. मला गारवा जाणवत होता. मला परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीरामाच्या रूपात आसनस्थ दिसत होते. त्या वेळी माझा नामजप एकाग्रतेने झाला. तेथे स्थापन केलेल्या पादुकांमधून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत होता.’ – श्रीमती क्रांती गांधी, बोरिवली

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका

१ अ २. गुरुपादुकांचे दर्शन झाल्यावर मन निर्विचार होणे, त्या ठिकाणी सतत सुगंध येणे : ‘मला सेवाकेंद्रातील तळमजल्यावरील कक्षात शांत आणि थंड वाटत होते. तेथे माझा नामजप एका लयीत होत होता. गुरुपादुकांचे दर्शन झाल्यावर माझे मन निर्विचार झाले. तेथे सतत सुगंध येत होता.’ – श्री. श्रीकांत राणे, भांडुप

१ अ ३. परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे, चंदनाचा सुगंध येणे आणि ‘गुरुपादुकांमधून चैतन्य प्रक्षेपित होऊन ते देहात पसरत आहे आणि त्यामुळे संपूर्ण देहाची शुद्धी होत आहे’, असे जाणवणे : ‘रामनाथी आश्रमात झालेल्या गुरुपादुका पूजनाच्या सोहळ्याप्रमाणेच येथे चालू असलेला सोहळा भासत होता. मला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी ‘गुरुपादुकांमधून चैतन्य प्रक्षेपित होऊन ते माझ्या देहात पसरत आहे आणि त्यामुळे माझ्या संपूर्ण देहाची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले. माझ्या संपूर्ण देहावर आलेले जडत्व गुरुपादुकांच्या केवळ दर्शनाने नष्ट झाले. मला भावाश्रू अनावर झाले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांशी एकरूप झाल्याची अनुभूती आली. तेथे चंदनाचा सुगंध दरवळत होता.’ – सौ. प्राची भाटकर, मुलुंड

१ आ. तेजतत्त्वाशी संबंधित अनुभूती

१ आ १. ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना त्यांतून पांढरा, निळा आणि सोनेरी या रंगांचा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते.’ – सौ. सुनंदा सुतार, मुलुंड

१ आ २. मन निर्विचार होणे, श्री दुर्गादेवीचे मारक रूपात दर्शन होणे आणि नामजप एकाग्र चित्ताने होऊन शांती अनुभवता येणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना माझे मन निर्विचार झाले. त्या वेळी माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवू लागल्या. मला श्री दुर्गादेवीचे मारक रूपात दर्शन झाले. ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर या साक्षात् श्री दुर्गादेवीचे मारक रूप आहेत’, असे मला तेव्हा वाटत होते. त्या वेळी मला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवले. माझा नामजप एकाग्र चित्ताने होऊन मला शांती अनुभवण्यास मिळाली.’ – सौ. अर्चना अंधारे, बोईसर

१ इ. वायुतत्त्वाशी संबंधित अनुभूती

१ इ १. गुरुपादुकांचे दर्शन घेतांना पुष्कळ गार वाटणे आणि दर्शनानंतर मनाची एकाग्रता वाढल्याचे जाणवणे : ‘त्या दिवशी सकाळपासूनच मला गुरुपादुकांचे दर्शन घेण्याची आंतरिक ओढ निर्माण झाली होती. गुरुपादुकांचे दर्शन घेतांना मला पुष्कळ गार वाटत होते. नामजप करत असतांना माझे मन शांत आणि निर्विचार झाले होते. माझा श्‍वासोच्छ्वास सावकाश होत होता. माझ्या मनाची एकाग्रता वाढली होती.’ – श्री. प्रवीण वर्तक, मीरा रोड

१ ई. आकाशतत्त्वाशी संबंधित अनुभूती

१ ई १. ध्यानमंदिरात गेल्यावर पोकळीत गेल्यासारखे जाणवणे आणि मनाची निर्विचार अवस्था अनुभवणे : ‘मला ध्यानमंदिरात पुष्कळ प्रकाश दिसत होता. त्या वेळी मला पोकळीत गेल्यासारखे जाणवले. ‘चैतन्याचा धबधब्यासारखा स्रोत वहात आहे’, असे मला वाटले. मला सर्व देवतांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी भरताने प्रभु श्रीरामाच्या पादुका स्थापन केलेले सिंहासन दिसले आणि मला त्रेतायुगात असल्यासारखे वाटले. माझ्या मनाची शांत आणि निर्विचार अवस्था होती.’ – सौ. आशा गंगाधरे, मुलुंड

१ ई २. दर्शन घेतांना गुरुपादुका पुष्कळ भव्य दिसणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना मला पुष्कळ थंड वाटत होते. ‘त्या पुष्कळ भव्य-दिव्य आहेत’, असे मला जाणवले. ‘या सेवाकेंद्रातील चैतन्य गुरुपादुकांच्या आगमनाने पुष्कळ वाढले आहे’, असे मला जाणवले.’ – कु. वैशाली भंडारी, बोरिवली

१ ई ३. गुरुपादुकांना नमस्कार करतांना गुलाबाचा सुगंध येऊन सहस्राराच्या ठिकाणी थंडावा जाणवणे आणि दैवी नाद ऐकू येऊन परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेत असतांना ‘आमच्यातील स्वभावदोष आणि अहं दूर होण्यासाठी प्रयत्न होऊ देत आणि आमची ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढू दे’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती. पादुकांना नमस्कार करतांना मला गुलाबाचा सुगंध आला आणि सहस्रारचक्राच्या ठिकाणी मला थंडावा जाणवत होता. त्या वेळी मला दैवी नाद ऐकू येत होता. ‘प्रत्यक्ष गुरुमाऊली पांढरा झब्बा आणि पायजमा या पोशाखात समोर उभी आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. मीना महाडिक, मुलुंड

२. गुरुपादुकांचे दर्शन घेतांना आरंभी त्रास होणे आणि नंतर चांगले वाटणे

२ अ. आरंभी शरीर जड होणे आणि गुरुपादुकांच्या दर्शनानंतर हलकेपणा जाणवून ‘गुरुपादुका हृदयात स्थापन झाल्या आहेत’, असे जाणवणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना मला आरंभी काहीच जाणवले नाही. मी गुरुदेवांना शरण गेल्यानंतर माझे आज्ञाचक्रापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर हळूहळू जड होत गेले. मी डोळे उघडून पुन्हा बंद केल्यावर शरिराचे जडत्व हळूहळू न्यून होऊन माझे शरीर हलके झाले. त्यानंतर माझे शरीर पुन्हा भारित झाले; मात्र त्यामध्ये जडत्व नव्हते. त्यानंतर ‘गुरुपादुका माझ्या हृदयात स्थापन झाल्या आहेत’, असे मला जाणवले.’ – श्री. काशिराम परब, भांडुप

२ आ. गुरुपादुकांच्या दर्शनानंतर शरिरातील त्रासदायक शक्ती न्यून होऊन शरीर हलके आणि चैतन्यमय झाल्याचे जाणवणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना माझ्या शरिरातील त्रासदायक शक्ती न्यून होत आहे आणि माझे शरीर हलके झाले आहे’, असे मला जाणवले. ‘माझा संपूर्ण देह आणि प्रत्येक पेशी चैतन्यमय झाली आहे’, असे मला वाटले.’ – सौ. वनिता धोत्रे, मुलुंड

२ इ. अंगाला घाम येऊन शरीर हलके वाटणे : ‘मी गुरुपादुकांचे दर्शन घेण्यासाठी ध्यानमंदिरात गेल्यावर माझ्या अंगाला घाम येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी आले. ‘माझ्या शरिरातून काहीतरी बाहेर निघून जात आहे आणि माझे शरीर हलके झाले आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ईश्‍वरी चैतन्य जाणवत होते.’ – सौ. जयश्री विजय रेळेकर, अंधेरी

२ ई. शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानाच्या ठिकाणी चैतन्य मिळणे आणि त्यानंतर ‘स्थापन केलेल्या गुरुपादुका हलक्या झाल्या असून हवेत तरंगत आहेत’, असे जाणवून मन शांत होणे : ‘माझ्या शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानाच्या ठिकाणी चैतन्य मिळून माझा आध्यात्मिक त्रास न्यून होत असल्याचे जाणवले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या गुरुपादुका प्रत्यक्ष घातल्या आहेत’, असे मला स्पष्ट जाणवत होते. ‘स्थापन केलेल्या गुरुपादुका पुष्कळ हलक्या झाल्या असून त्या हवेत तरंगत आहेत’, असे मला दिसले. त्यानंतर माझे मन शांत झाले.’ – श्री. तुषार मोरे, कुर्ला

२ उ. विशुद्ध आणि अनाहत या चक्रांच्या ठिकाणी दाब जाणवणे आणि नंतर तो न्यून होऊन आनंद वाटणे : ‘आरंभी मला मोगर्‍याचा सुगंध येत होता. गुरुपादुकांमधून प्रक्षेपित होणारा पांढरा प्रकाश माझ्या सहस्रारातून आज्ञा आणि विशुद्ध या चक्रांच्या ठिकाणी आल्यावर माझ्या गळ्यावर अकस्मात् दाब जाणवू लागला. मला अनाहतचक्राच्या ठिकाणीही पुष्कळ दाब जाणवत होता. त्यानंतर मला खोकला आणि जांभया येऊन दाब न्यून झाला आणि मला आनंद जाणवू लागला. ‘जय गुरुदेव’ हा नामजप मला आतूनच ऐकू येत होता. त्या वेळी माझ्या कानातून गरम वाफा बाहेर पडून नंतर मला थंडावा जाणवला आणि मी आनंदी झाले.’ – सौ. सुशीला मुंढे, मुलुंड

३. चैतन्य मिळत असल्याचे जाणवणे

३ अ. ‘ध्यानमंदिरात प्रवेश करताच मला थंडगार स्पर्श जाणवला. गुरुपादुकांचे दर्शन घेतांना मला गुरुदेवांचे पूजन करतांनाचे चरण दिसत होते. त्यातून प्रकाश प्रक्षेपित होत होता. मला रामनाथी आश्रमात गेल्यासारखे वाटले.’ – सौ. दीपाली उपळेकर, भांडुप

३ आ. ‘माझी भावजागृती झाली. ‘गुरुदेवांचे चरण तेथे आहेत’, असे जाणवले.  – सौ. दक्षता जाधव, मुलुंड

४. भावजागृती होणे

‘गुरु मेरी पूजा, गुरुगोविंद…’ हे गीत आठवून रामनाथी आश्रमातील गुरुपादुका पूजनाचा सोहळा आठवून सतत भावजागृती होत होती. माझे मन शांत झाले. ‘गुरुविना कुणी नाही’, असे मला वाटत होते.’ – सौ. प्रभा देसाई, मुलुंड

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.