कासार्डे येथे सिलिका वाळूची वाहतूक करणारे ११ ट्रक ग्रामस्थांनी रोखले

महसूल विभागाकडून ११ ट्रक कह्यात

 कणकवली – कासार्डे येथील सिलिका वाळूच्या वाहतुकीवर महसूल विभागाने यापूर्वी कारवाईचा बडगा दाखवला होता, तरीही अनधिकृत वाहतूक चालू आहेच. ७ एप्रिल या दिवशी अशाच प्रकारे चालू असलेली सिलिका वाळूची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली. ग्रामस्थ आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी अनधिकृत वाहतूक करणारे ५, तर क्षमतेहून अधिक वाहतूक करणारे ६, असे ११ ट्रक कह्यात घेतले. एकीकडे महसूल विभागाकडून कारवाई चालू असतांनाच अनधिकृत वाहतूक राजरोसपणे चालू आहे, यावरून पोलीस आणि प्रशासन यांचा सिलिका वाळूची वाहतूक करणार्‍यांवर किती वचक आहे, हे स्पष्ट होते. कह्यात घेतलेले अकराही ट्रक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून उभे करण्यात आले आहेत. या ट्रकमधील सिलिका वाळूची मोजमापे घेऊन,  तसेच कागदपत्रे तपासून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार आर्.जे. पवार यांनी सांगितले.