ससून रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांची संपावर जाण्याची चेतावणी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर एम्.बी.बी.एस्. डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असणे गंभीर आहे. नियुक्त्या का केल्या गेल्या नाहीत, हे शोधून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. वरिष्ठांनी डॉक्टरांच्या नियुक्ती लवकरात लवकर करून यंत्रणेवरील ताण न्यून करावा, ही अपेक्षा !

पुणे – गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ससून हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर गेल्या वर्षभरापासून कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी काम करत आहेत; मात्र हे काम करत असतांना त्यांना दिली जाणारी इतर प्रशिक्षणे पूर्णपणे बंद आहेत. ‘गेल्या वर्षभरामध्ये प्रशासनाने एम्.बी.बी.एस्. डॉक्टरांची नियुक्ती करणे शक्य असतांनाही ती केली नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्येही निवासी डॉक्टरांना कोविड आणि नॉन कोविड ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही शिकायचे कसे आणि काय ?’, असा प्रश्‍न निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर प्रशिक्षण चालू करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर संपावर जाऊ’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. ‘कामाचा ताण असल्यामुळे अभ्यासामध्ये लक्ष देता येत नाही. दिवसाचे १८ घंटे काम करावे लागत आहे’, अशा तक्रारीही त्यांनी केल्या आहेत.