गोवा मुक्तीलढ्यात भारतीय सेनेने वापरलेल्या रणगाड्यांची बेळगाव येथे दयनीय स्थिती

गोवा राज्य गोवामुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत असतांना गोवा मुक्तीलढ्यातील मानचिन्हे ठरलेल्या रणगाड्यांच्या देखभालीकडे गोवा शासनाने लक्ष देण्याची बेळगाव येथील युवा कार्यकर्त्यांची मागणी

पणजी, ३ एप्रिल – गोवा राज्य गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत आहे, तरीही पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीपासून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने वापरलेले रणगाडे बेळगावी येथे अजूनही दयनीय स्थितीत पडून आहेत. बेळगाव जिल्ह्यात टिळकवाडी आणि बामणवाडी अशा २ ठिकाणी प्रत्येकी २ रणगाडे आढळले आहेत, असा दावा बेळगाव येथील काही युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. गोवा राज्य गोवामुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत असतांना गोवा मुक्तीलढ्यातील मानचिन्हे ठरलेल्या या रणगाड्यांच्या देखभालीकडे गोवा शासनाने लक्ष देण्याची मागणी या युवा कार्यकर्त्यांनी केली आहे.

बेळगाव येथील युवा कार्यकर्ते गौरंग गेंजी, महंतेश हमगुट्टी, संरक्षण खात्यातील काही निवृत्त कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी बामणवाडी येथे भेट दिली असता त्यांना दयनीय स्थितीत २ रणगाडे सापडले. या ठिकाणी भेट दिलेल्या या गटातील सदस्यांनी रणगाड्यांची स्वच्छता करून त्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची मोहीम आरंभली आहे. याविषयी गौरंग गेंजी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘हे रणगाडे म्हणजे पोर्तुगिजांचा पराभव करणार्‍या भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतिक आहे. गोवा मुक्तीलढ्यातील रणगाड्यांच्या योगदानाचा आज विसर पडला आहे. वर्ष १९६१ पासून देखभाल न झाल्याने या रणगाड्यांची स्थिती दयनीय झाली आहे. रणगाड्यांचे काही भाग चोरीस गेले आहेत. गोवा मुक्तीला ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या कारणास्तव गोवा राज्य वर्षभरासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचे समजते. गोव्यातील अधिकार्‍यांनी या भागात भेट द्यावी आणि रणगाड्यांच्या देखभालीकडे लक्ष द्यावे. हे रणगाडे पुढील पिढीला प्रेरणादायी ठरू शकतात.’’

तत्पूर्वी मागील वर्षी जुलै मासात बेळगाव येथील कार्यकर्त्यांच्या एका गटाला अशाच प्रकारे गोवा मुक्तीलढ्यात वापरलेले २ रणगाडे टिळकवाडी येथे सापडले होते. या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली आणि त्यांच्या देखभालीसाठी प्रयत्न केला. या ठिकाणी रणगाड्याचे महत्त्व दर्शवणारा फलकही लावण्यात आला आहे.