पीडित महिलेची तृप्ती देसाईंसह पुण्यात पत्रकार परिषद
पुणे, १ एप्रिल – परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडिओ सिद्ध करून माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत; पण मला केवळ अन्वेषण चालू असल्याचे सांगितले जाते, तर राजेश विटेकर यांनी ‘शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा नोंद होणारच नाही’, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेने सांगितले. पीडित महिलेने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंसह १ एप्रिल या दिवशी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन वरील आरोप केले आहेत, तर दबावापोटी पोलीस राष्ट्रवादीच्या या नेत्यांवर कोणताही गुन्हा नोंद करत नाहीत. राजेश विटेकर कुठल्याही पक्षाचे नेते असले, तरी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा. यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे. अनेकांकडे या पीडित महिलेने साहाय्य मागितले; परंतु त्यांना साहाय्य मिळाले नाही. त्यानंतर आता ही महिला भूमाता ब्रिगेडकडे आली आहे.
पीडितेचा आरोप काय ?
राजेश विटेकर यांच्या आई विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा आहे. त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहेत. गृहखाते आमचे आहे. सत्ता आमची आहे. माझ्याविरोधात गुन्हा नोंद करू शकणार नाही. बंदुकीचा धाक दाखवून लग्नाचे अमीष दाखवून माझ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण केले. राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना पाठीशी घालण्याचे काम करत असून मला आणि माझ्या कुटुंबियांना विटेकर यांच्याकडून धोका असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.
पीडितेने पुढे सांगितले की, मी एक शिक्षिका असून माझ्यावर असे अत्याचार होत असतील, तर इतर अशिक्षित महिलांवर किती अन्याय होत असतील. सत्ताधारी पक्षातील नेते असे करत असतील, तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा ? माझ्याविरोधात अपकीर्ती करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत, माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटसह अनेक पुरावे आहेत. मुलींची अब्रू लुटायची आणि त्यांच्यावर मानहानीचा दावा प्रविष्ट करायचा, हा कुठला प्रकार ? सुप्रिया सुळेंकडे मी अनेकदा तक्रार केली; परंतु माझी दखल घेतली नाही, मी जिवंत आहे म्हणून तुम्हाला न्याय द्यावा, असे वाटत नाही का ? असा प्रश्नही पीडितेने केला आहे.