सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

सचिन वाझे

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एन्.आय्.ए. कोठडी ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. २५ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वाझे यांना विशेष एन्आयए न्यायालयात उपस्थित केले होते.

सचिन वाझे यांच्या विरोधात आतंकवादी कृत्ये किंवा राष्ट्रविरोधी कृत्ये यांविरोधात लावण्यात येणारा ‘गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम’ (UAPA) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयात वाझे यांच्या अधिवक्त्यांनी त्यांची बाजू मांडतांना म्हटले की, केवळ जिलेटिनच्या कांड्यांनी विस्फोट करू शकत नाही. त्यासमवेत ‘डिटोनेटर’ असला, तरच ते विस्फोटक मानले जाते. अंबानी यांच्या निवासस्थानी असलेल्या गाडीत किंवा वाझे यांच्याकडे असे कुठलेही ‘डिटोनेटर’ सापडले नाही. त्यामुळे या कृत्याला ‘आतंकवादी कृत्य’ म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद केला. यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून प्रतिवाद करतांना वाझे यांचा गुन्हा देशपातळीवरील मोठा गुन्हा आहे. एखाद्या गुन्ह्यात पोलिसाचा सहभाग असणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. वाझे यांच्याकडे अवैधपणे ६२ जिवंत काडतुसे आढळली. शासनाकडून देण्यात आलेली काही काडतुसे त्यांच्याकडून गहाळ आहेत, असे न्यायालयात सांगून १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली.

बळीचा बकरा बनवला जात असल्याचे सचिन वाझे यांचे न्यायालयात निवेदन

न्यायालयात सुनावणीच्या वेळी मला बळीचा बकरा बनवला जात आहे. मी दीड दिवस या प्रकरणाचा अन्वेषण अधिकारी होतो. जे अन्वेषण करायचे होते, ते करून झाले आहे. मला आणखी ‘एन्.आय.ए.’ कोठडी देऊ नका. मला न्यायालयाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, असे निवेदन सचिन वाझे यांनी केले. यावर ‘जे सांगायचे आहे, ते लेखी द्या’, असे या वेळी न्यायालयाने म्हटले.