पाणीपट्टी सोडून आयुक्तांच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही
कोल्हापूर, २४ मार्च (वार्ता.) – पाणीपट्टीमध्ये काही ठराविक वाढ सोडून अन्य कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला ६२३.४८ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संमत केला. २० सहस्र लिटरपर्यंत पाणी वापरणार्यांसाठी कोणतीही करवाढ नाही, ४० सहस्र लिटरपर्यंत पाणी वापरणार्यांसाठी ३० टक्के (१ लिटरसाठी १ रुपया १५ पैसे), तसेच ४० सहस्र लिटर पाणी वापरणार्यांसाठी १ लिटरसाठी ३ रुपये वाढ प्रस्तावित केली आहे, अशी माहिती डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
या संदर्भात आयुक्त म्हणाल्या, ‘‘घरपट्टी, आरोग्य, परवाना शुल्क, परिवहन उपक्रम यांत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. वर्ष २०१३-१४ पासून एकदाही पाणीपट्टीत वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा केवळ काही ठराविक वापराच्या पुढे वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून हे शहर आदर्श निर्माण होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असतील.’’
अर्थसंकल्पातील अन्य काही ठळक गोष्टी१. के.एम्.टी. वाहनांसाठी ‘सी.एन्.जी.’ पंप उभारणे. केवळ महिला आणि विद्यार्थी यांसाठी नवीन ‘सी.एन्.जी.’ गाड्या स्थानिक आमदार विकास निधीतून खरेदी करणे. नव्याने होणार्या ‘सी.एन्.जी.’ गाड्यांद्वारे जोतिबा/पन्हाळा/कोल्हापूर दर्शन बससेवा चालू करणे. व्हिनस कॉर्नर ते श्री महालक्ष्मी मंदिर येथे पर्यटकांसाठी ‘शटल सर्व्हिस’ चालू करणे. २. शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, संवर्धन यांसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ३. कोल्हापूर महापलिका क्षेत्रात केंद्रीय ध्वनीक्षेपक यंत्रणा उभारणे. याद्वारे एकाच ठिकाणावरून नागरिकांना आवश्यक त्या सूचना देता येतील. ४. कोटीतीर्थ तलावाचे प्रदूषण अल्प करणे, संवर्धन करणे यांसाठी ३.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. |