उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. जयवर्धन पंकज घोलप हा आहे !
‘फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया (१५.३.२०२१) या दिवशी चि. जयवर्धन पंकज घोलप याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. स्वाती पंकज घोलप आणि त्यांच्या २ मावशा (आईच्या बहिणी) यांंना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. जयवर्धन पंकज घोलप याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. स्वाती पंकज घोलप (चि. जयवर्धनची आई), नगर
१ अ. गर्भारपणी केलेले प्रयत्न
१ अ १. १ ते ३ मास
१ अ १ अ. वर्गातील मुलांना ‘प्रार्थनेच्या वेळी देशभक्तीपर गीत, स्तोत्रे आणि त्यांचा अर्थ, तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व सादर करण्यास सांगावे’, असे आतूनच वाटणे : मी गर्भार असतांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरी ते सातवीच्या विद्यार्थांना शिकवायचे. आरंभी या काळात मला ‘बाळावर संस्कार कसे होतील ?’, याची काळजी वाटायची. मी ज्या वर्गाची वर्गशिक्षिका होते, त्या वर्गाला मी प्रार्थनेच्या वेळी मुलांना देशभक्तीपर गीत, स्तोत्रे आणि त्यांचा अर्थ, तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व, असे सादर करण्यास सांगायचे. इंग्रजी माध्यमाच्या गुणवत्तेत प्रथम असलेल्या शाळेत ‘अशा प्रकारे कृती करावी’, असे मला आतूनच वाटायचे. जणू गर्भधारणा झाल्यावर गर्भातील जीव मला हे सर्व सुचवत होता आणि विशेष म्हणजे मुख्याध्यापिकाही मला यासाठी सहज अनुमती द्यायच्या. मी वर्गातील मुलांना क्रांतीकारकांच्या बलीदानाविषयी, उदा. छत्रपती शिवाजी महाराज, सीमेवर लढणारे सैनिक यांच्याविषयी गोष्टी सांगत होते.
१ अ १ आ. विद्यार्थ्यांना सारणी लिखाण करण्याची सवय लावणे : मी वर्गातील विद्यार्थ्यांना स्वभावदोषांची सारणी नियमितपणे ती लिहून आपापल्या पालकांना दाखवायला सांगितली. त्यानंतर पालकांना विद्यार्थ्यांमध्ये झालेले पालट लिहून देण्यास सांगितले. पालकांनी ‘मुलांना सारणी लिखाणाचा लाभ झाला आणि मुले स्तोत्रे आवडीने म्हणतात’, असे सांगितले. सारणी लिखाणाचा विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर पुष्कळ प्रभाव दिसून आला. हे सर्व कुठलीही पूवसिद्धता नसतांना उस्फूर्तपणे सुचायचे.
१ आ. ५ ते ८ मास
१ आ १. ‘ॐ कार प्राणायाम’ करणे : मला ५ वा मास चालू असतांना मी ‘ॐ कार प्राणायाम’ करण्यास आरंभ केला. त्यामुळे मनात सकारात्मक विचार येऊन दिवसभर मला उत्साह वाटायचा.
१ आ २. बाळाने स्तोत्र ऐकण्याची आठवण करून दिल्याचे जाणवणे : ५ व्या मासापासून मी नियमित रामरक्षा आणि विष्णुसहस्रनाम ऐकायचे. एकदा मी कामाच्या गडबडीत स्तोत्र ऐकण्याचे विसरले आणि झोपायला गेले. त्या वेळी गर्भातील हालचाली पुष्कळ वाढल्याचे माझ्या लक्षात आले. मी पोटावर हात ठेवून रामरक्षा म्हणायला लागल्यावर हालचाल मंद झाली. त्या वेळी ‘बाळाने स्तोत्र ऐकण्याची आठवण करून दिली’, असे मला जाणवले.
१ आ ३. गर्भातील जीव अयोग्य विचार आणि कृती करण्यापासून परावृत्त करत असल्याचे जाणवणे : मला कुणाविषयी प्रतिक्रिया आली किंवा अयोग्य कृती करावीशी वाटली, तर आतून ‘तशी कृती करू नये’, असे वाटायचे आणि योग्य कृती केल्यावर पुष्कळ आनंद होऊन शांत वाटायचे. जणू गर्भातील जीव मला अयोग्य विचार आणि कृती करण्यापासून परावृत्त करत होता.
१ इ. जन्मानंतर
१. बाळ (जयवर्धन) जन्मापासूनच पुष्कळ शांत आहे. त्याला झोपतांना रामरक्षा किंवा रामाचा पाळणा ऐकायला आवडायचे.
२. बाळाच्या कपाळावर (आज्ञाचक्राच्या ठिकाणी) जन्मतः टिळ्याच्या आकाराची लहान ज्योतीसारखी दिसणारी पांढरी खूण आहे.
१ ई. वय – ३ ते ६ मास
१. जयवर्धन पहिल्या मासापासूनच रामरक्षा ऐकतांना बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करून किंवा तोंडवळ्यावर वेगवेगळे भाव ठेवून ऐकत असे.
२. तो ३ मासांचा असतांना ‘ॐ’ कार ऐकल्यावर हसून प्रतिसाद द्यायचा आणि ‘ॐ’ कार म्हणण्याचा प्रयत्न करायचा.
३. ४ मासांच्या जयवर्धनला मांडीवर घेऊन मी परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात होते. तेव्हा तो सर्व ऐकत असल्यासारखा भ्रमणभाषकडे लक्षपूर्वक पहात होता आणि प.पू. गुरुमाऊलींना पाहून पुष्कळ हसत होता. तो मला बोटाने गुरुमाऊलींना दाखवत होता.
४. त्याचे बाबा देवघरात बसून मोठ्याने देवाचे नाव घेतात. तेव्हा जयवर्धन घरात कुठेही असला, तरी घाईघाईने रांगत जातो आणि बाबांच्या मांडीवर बसून आनंदाने हसत टाळ्या वाजवतो.
१ उ. वय – ७ मास ते १ वर्ष
१. जयवर्धन ९ मासांचा असतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी त्याचे छायाचित्र पाहून तो पुष्कळ सात्त्विक असल्याचे सांगितले.
२. श्रीवर्धनला (६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेला जयवर्धनचा मोठा भाऊ) पाहून त्याला पुष्कळ आनंद होतो. त्याच्याशी खेळायला त्याला पुष्कळ आवडते.
३. कृष्णाशी बोलणे
तो देवघरात श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून काहीतरी बडबडत असतो. तेव्हा तो कृष्णाशी बोलत असल्यासारखे वाटते.
हे दयाघना, हे सर्वव्यापी भगवंता, ‘तुझी कृपा समजून घेण्याइतकी माझी बुद्धी नाही. तू जे काही करतोस, ते सर्व आमच्या साधनेसाठीच. ‘या बालकांवर धर्माचरणाचे संस्कार कसे करायचे ?’, हे तूच मला शिकव आणि तसे माझ्याकडून करवून घे’, अशी तुझ्या चरणी तळमळीची प्रार्थना आहे.’ (१.३.२०२१)
२. कल्याणी बंगाळ (चि. जयवर्धनची मावशी), फोंडा, गोवा.
१. जयवर्धन नेहमी आनंदी असतो. तो हसतो, तेव्हा त्याच्याकडे बघून पुष्कळ छान वाटते. लहान मुले सहसा नवीन व्यक्तींमध्ये मिसळत नाहीत; पण जयवर्धन कुणामध्येही सहज मिसळतो.
२. तो झोपलेला असला की, बहुतेक वेळा त्याच्या हाताच्या बोटांंची वेगवेगळी मुद्रा केलेली असते.
३. कु. भावना कदम (चि. जयवर्धनची मावशी), नंदुरबार
३ अ. शांत स्वभाव : चि. जयवर्धन शांत असून ‘लहानपणापासून त्याच्यावर गुरुदेवांचे लक्ष आहे’, असे लक्षात येते. त्याने कधीच कसला त्रास दिला नाही.
३ आ. सात्त्विकतेची आवड
१. त्याला देवाचे गाणे किंवा स्तोत्रे ऐकायला पुष्कळ आवडते. स्तोत्र म्हटले किंवा भ्रमणभाषवर लावले की, तो लगेच शांत होऊन झोपी जायचा.
२. त्याला गोंधळ असलेल्या ठिकाणी थांबायला आवडत नाही. तो असात्त्विक व्यक्तींकडे जात नाही.
३. तो सकाळी लवकर उठून त्याच्या पणजीसमवेत शांतपणे खेळत असतो.
सदैव आपली कृपादृष्टी राहो या जिवावरी गुरुराया ।
क्षात्रवृत्ती आणि प्रेमभाव असे याच्या अंगी ।
साधनेचे बाळकडू मिळाले यास आईच्या कुशीतूनी ॥ १ ॥
धर्मकार्य करण्यासाठी हा जीव आला भूवरी ।
साधनेसह मार्गक्रमण करी हा क्षणोक्षणी ॥ २ ॥
सदैव आपली कृपादृष्टी अन् वरदहस्त राहो या जिवावरी ।
हेच मागणे आहे आता गुरुराया तव चरणी ॥ ३ ॥
– कु. भावना कदम
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|