वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे या वर्ष १९९७ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘माझ्या जीवनातील माझा पहिला गुरु माझी आई आहे’, असे मी लहानपणापासून अनुभवत आहे. ‘आईविषयी ‘कृतज्ञता’ शब्द लिहिण्याची संधी मला परात्पर गुरुमाऊलींनी दिली’, याविषयी मी कृतज्ञ आहे. मी ही कृतज्ञतापुष्पे गुरुदेवांच्या चरणी समर्पित करते.
१. कष्टाळू
१ अ. आईचा जन्म वर्ष १९४८ मध्ये नगर जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. माझ्या आजीला ७ अपत्ये होऊन ती वारली. आई मोठी असल्याने लहानपणापासून तिने घरातील सर्व कामे केली. आजीला तिच्या बाळंतपणात माझ्या आईचाच आधार होता. आईच्या अपार कष्टांना तेथूनच आरंभ झाला.
१ आ. आईला १५ वर्षांपासून मधुमेह आहे. त्यामुळे तिची हाडे कमकुवत झाली आहेत, तरीही ती कधीच शारीरिक दुखण्याला महत्त्व देत नाही. तिने वय आणि व्याधी या कोणत्याच कार्यात कधी आड येऊ दिल्या नाहीत.
२. काटकसरी
२ अ. आई बालपणापासून ते वयाच्या चाळीशीपर्यंत बेताच्या आर्थिक परिस्थितीत राहिली. त्यातच तिने आदर्श संसार केला. अत्यल्प भांडी आणि अत्यल्प साहित्य वापरून उत्कृष्ट स्वयंपाक करणे, हे मी आईकडूनच शिकले.
२ आ. भाजी स्वस्त असतांना आई ती अधिक प्रमाणात आणून ठेवत असे आणि ती भाजी प्रतिदिन विविध प्रकारे करत असे. ती भाजीमध्ये मसाला, दाण्याचे कूट किंवा खोबरे घालत नाही. कोथिंबीर, कढीपत्ता आणि तिचा भाव यांमुळे तिने बनवलेल्या पदार्थाला रुची येते. आई विविध पाककृती करते.
२ इ. ती म्हणते, ‘‘अन्न हे पूर्णब्रम्ह आहे.’’ त्यामुळे तिने अन्नाचा एक कणही कधी वाया घालवला नाही. कालांतराने आई-बाबांची आर्थिक स्थिती चांगली झाली, तरी तिने तिचे पूर्वायुष्यातील रहाणीमान सोडले नाही. तिने अन्न कधी टाकून दिले नाही, तसेच महाग साड्या कधीच घेतल्या नाहीत.
३. मुलींना घडवणे
३ अ. मुलींवर धर्माचे संस्कार करणे : आईने आम्हा तिन्ही बहिणींवर धर्माचे संस्कार केले. तिने आमच्यामध्ये देशाभिमानही निर्माण केला. ती मला नेहमी संतकथा, रामायण, महाभारत यांतील कथा सांगत असे. आई आम्हाला लहानपणापासून जेथे कीर्तन, प्रवचन, भागवतसप्ताह, रामकथा चालू असेल, तेथे घेऊन जात असे. त्यामुळे आमची शाळा चुकायची; पण आईला हे सर्व मी ऐकणे आणि हेच शिकणे आवश्यक वाटायचे. आज माझ्यामध्ये जो राष्ट्र आणि धर्म यांविषयीचा अभिमान आहे, तो माझ्या आईमुळेच आहे. श्रीगुरूंनी मला दिलेली ‘समर्थ’ची (‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत छापून येणार्या बोधचित्राची) सेवा करण्यासाठी लागणारा राष्ट्राभिमान, धर्माभिमान आणि क्षात्रतेज हे गुण आईनेच माझ्यात निर्माण केले आहेत.
३ आ. कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाण्यास शिकवणे : मी तिला माझ्या जीवनात घडलेला एखादा प्रसंग सांगितल्यावर ती मला संतांच्या जीवनातील तशाच प्रसंगांचा दाखला देऊन समजावते. त्यामुळे मला तिचा आधार वाटतो. तिने मला जीवनातील कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाण्यास शिकवले.
३ इ. दिनचर्या आणि ऋतुचर्या यांच्या नियमांचे पालन करण्यास शिकवणे : आई आयुर्वेदाचार्य असल्याने ती ऋतुप्रमाणे स्वयंपाक बनवते. तिने आम्हालाही तशाच सवयी लावल्या आहेत. दिनचर्या आणि ऋतुचर्या यांच्या नियमांचे पालन केल्यामुळे वयाच्या चाळीशीपर्यंत मी कधी रुग्णाइत झाले नव्हते. तिने नेहमी आयुर्वेदातील तत्त्वे आचरणात आणली आणि धर्मपालन केले.
४. प्रेमभाव
४ अ. प्राण्यांचे दुःख सहन न होऊन त्यांना साहाय्य करणे : आई मुंगीलाही कधी मारत नाही. ती अंगावर आलेली मुंगी हळुवारपणे उचलून शरिरापासून दूर करते. घराच्या जवळ गाय, कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्याच्या अंगावर जखम झाल्याचे दिसले, तर ती लगबगीने वाटीत कापराची पूड आणि तेल घेऊन ते प्राण्यांच्या जखमेवर लावते अन् त्यांना पोळी खाऊ घालून पाणी पाजते. तिला कुणाचेही दुःख बघवत नाही. समोरच्याचे दुःख दूर करण्यासाठी तिची घालमेल चालू असते.
४ आ. व्यक्तीच्या वेदनांची तीव्रता जाणून घेऊन साहाय्य करणे : कुणाचे काही दुखत असल्यास तिला त्या व्यक्तीच्या वेदना समजतात. त्या व्यक्तीच्या वेदनांची तीव्रता जाणून ती त्या व्यक्तीला साहाय्य करते. त्यांच्या तोंडाला चव नसेल, त्यांना अन्न जात नसेल, तर त्यांना काहीतरी पदार्थ देते किंवा मनाची स्थिती नीट नसेल, तर त्यांना तसे साहाय्य करते.
४ इ. रुग्ण व्यक्तीला औषधे आणि फळे पाठवून प्रेमाने समजावणे : एकदा येथील एका अधिकोषातील व्यक्तीने (‘सनातन प्रभात’चे वाचक) मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुमच्या बाबांच्या छातीत दुखत असतांना त्यांना कोणत्या आधुनिक वैद्यांना दाखवले ?’’ तेव्हा आईने त्या दादांना ‘काय होतय ?’, हे विचारून त्यांना प्रेमाने सांगितले, ‘‘मी तुम्हाला गोळी, आल्याचा चहा, काढा, दुःखनिवारक तेल आणि डाळींब पाठवते. काळजी करू नका.’’
५. प्रसंगात सकारात्मक राहून त्वरित उपाययोजना काढणे
प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू.बाबांच्या) भजनांत त्यांनी लिहिले आहे, ‘दु:ख माझ्याकडे यायला घाबरते.’ आईचे जीवन तसेच आहे. ती कोणतेच संकट किंवा प्रसंग यांना घाबरत नाही. ती सतत सकारात्मक राहून त्वरित उपाययोजना काढते आणि कृतीच्या स्तरावर प्रयत्नांना आरंभ करते. आम्ही चर्चा करत असतांना किंवा काही ठरवत असतांना ती उठून लगेचच कृती करते. हा तिचा फार मोठा गुण आहे. अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. आईने तिच्या सांसारिक आणि व्यावहारिक जीवनात वरील सूत्र आचरणात आणल्याने तिला आता कशाचेच काहीही वाटत नाही.
६. इतरांना साहाय्य करणे
ती इतरांना साहाय्य करतांना हातचे राखून करत नाही. तिने स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन कुटुंबीय आणि नातेवाईक यांना तन,मन आणि धन यांद्वारे साहाय्य केले आहे. ‘कुणी संकटात आहे, त्याला काही अडचण आहे, आधाराची आवश्यकता आहे’, हे समजल्यावर आई ताटावरून उठून साहाय्याला धावून जाते.
७. धर्मग्रंथ, तसेच संत आणि क्रांतीकारक यांच्या चरित्रांचे वाचन करणे
आईचे पुष्कळ वाचन आहे. एवढेच नव्हे, तर वाचलेले तिच्या कायम स्मरणात रहाते. तिचे वाचन अभ्यासपूर्ण असते. ती वाचलेल्या ग्रंथांमधील ज्ञान ग्रहण करण्याचा, तसेच ग्रहण केलेले इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतेे. तिने ‘कल्याण’ मासिकाचे नियमित वाचन केले आहे, तसेच पुष्कळ धर्मग्रंथ, संत आणि क्रांतीकारक यांच्या चरित्रांचे वाचन केले आहे. तिने पूर्वी वाचलेले आता वयाच्या ७२ व्या वर्षीही तिला आठवते.
८. आईने प्रबोधन केल्यावर व्यक्तींमध्ये झालेले पालट
८ अ. मस्ती, गुंडगिरी आणि चोर्या करणार्या मुलांना चांगल्या गोष्टी सांगून त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यावर मुलांमध्ये चांगला पालट होणे : पनवेलमधील देवद गावातील १२ ते १५ वर्षे वयोगटातील काही मुले संकुलात येऊन मस्ती, गुंडगिरी आणि चोर्या करत असत. आई त्यांना बोलावून चांगल्या गोष्टी सांगायची आणि त्यांना अयोग्य कृतींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असे. तेव्हा त्यातील काही मुले आमच्या घरासमोरून जातांना ‘आजी.’, अशी हाक मारून तिला भेटून जात. त्यातील विनोद नावाचा एक मुलगा आईच्या बोलण्याने प्रभावित होऊन चांगले वागण्याचा प्रयत्न करू लागला. आईने त्याला साधनेविषयी सांगतल्यावर तो सर्व अयोग्य कृती सोडून तिच्याकडे येऊ लागला. तो आईला ‘काही साहाय्य हवे का ?’, असेही विचारत असे. तो शालेय शिक्षण पूर्ण करून पदवीधर झाला. त्याचे आई-वडील बिगारी काम करत असत. आता आम्ही गोव्याला आलो, तरी विनोद आजीची कृतज्ञतेने आठवण काढतो आणि विचारपूस करतो. तो आता चांगल्या आस्थापनात नोकरी करून संसारही करत आहे.
८ आ. देवद गावात जाऊन गावकर्यांशी प्रेमाने बोलणे आणि त्यांना साधनेविषयी सांगितल्याने गावकर्यांमध्ये पालट होणे : देवद आश्रमाच्या परिसरातील काही गावकर्यांना सनातनच्या आश्रमाविषयी पुष्कळ अपसमज होते. ते आश्रमाविषयी वाईट बोलत असत. तेथे आई वर्ष २००६ पासून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायला जायची. तेव्हा आई तेथील गावकर्यांना प्रेमाने साधनेविषयी सांगत असे. कालांतराने तेथील गावकरी आईला सनातनविषयी विचारू लागले.
९. कृतज्ञताभाव
९ अ. बाजारात भाज्या आणि फळे पाहून संत अन् साधक यांची आठवण येऊन देवाच्या चरणी कृतज्ञता वाटणे : बाजारात भाज्या आणि फळे पाहून ‘देव कसा निरनिराळ्या प्रकारच्या, रंगांच्या आणि चवीच्या भाज्या पिकवतो. मधुर-आंबट सर्व तर्हेची सात्त्विक फळे देव बनवतो’, असे ती म्हणते. ते पाहून तिला कृतज्ञता वाटते. डाळींब, रामफळ, सीताफळ ही फळे पाहिल्यावर तिला परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि साधक यांची आठवण येते.
९ आ. अन्न-धान्याविषयी कृतज्ञता वाटणे : पूर्वीपासून जेवतांना ती म्हणते,‘‘भगवंता, तुझ्यामुळेच हे ताजे, सात्त्विक आणि रुचकर अन्न मिळत आहे.’’ तिला अन्न-धान्याविषयी कृतज्ञता वाटते. आईच्या या भावामुळे घरात अन्न-धान्याची कधीही उणीव भासली नाही. तिने एखादा पदार्थ केला आणि साधकांना दिला, तरी तो संपत नाही. ‘बरकत’ म्हणतात ना, तसेच घडते.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना
आईविषयी जितके लिहू, तितके अल्पच आहे. तिचे पूर्ण आयुष्य फारच संघर्षमय, कष्टप्रद आणि दैवी अनुभूतींनी भरलेले आहे. ‘मला विविध गुणांनी नटलेल्या अशा मातेच्या उदरी जन्माला घातले’, याविषयी मी कृपाळू भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे. आईमुळे आम्ही सर्व साधनेत आलो आणि टिकून आहोत. ‘तिचे गुण माझ्यात येऊ देत आणि माझ्या आईला ‘पू. आई’, असे संबोधता येऊ दे’, अशी मी विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणकमली शरणागतीने प्रार्थना करते.
– सौ. गौरी वैभव आफळे (धाकटी मुलगी) ढवळी, फोंडा (गोवा)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |