सातारा, ८ मार्च (वार्ता.) – पाटण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या जागेतील वादग्रस्त झुणका-भाकर केंद्राचे अतिक्रमण प्रशासनाने पाडले. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी हे अतिक्रमण पाडले. जिल्हा पुरवठा विभागाने शेवटची नोटीस देऊन संबंधित केंद्रचालकास म्हणणे मांडण्यास सांगितले. यावर संबंधित केंद्रचालकाने काही दिवसांचा अवधी मागितला; मात्र प्रशासनाने ३ मार्च या दिवशी धडक कारवाई करत अतिक्रमित झुणका-भाकर केंद्र भुईसपाट केले.
युती शासनाच्या कालखंडामध्ये राज्यात झुणका-भाकर केंद्रे चालू करण्यात आली होती. काही वर्षांनंतर ही केंद्रे बंद पडली; मात्र झुणका-भाकर केंद्रचालकांनी या ठिकाणी उपाहारगृह आणि इतर व्यवसाय चालू केले. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने अशा झुणका-भाकर केंद्रचालकांना रीतसर नोटीस देऊन ती मोकळी करण्याविषयी सांगण्यात आले होते. १-२ केंद्रचालक वगळता इतरांनी केंद्रांची जागा शासनाकडे सोपवली; मात्र पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील केंद्र महसूल प्रशासनाला कह्यात घेता आले नाही.