कोकणातील युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

श्री भराडीदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने पाटबंधारे प्रकल्पांचे भूमीपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग – शेती ही शाश्‍वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकर्‍यांनी केवळ दोन घास दिले नाहीत, तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने चालू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम् सुफलाम् करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या यात्रोत्सवाच्या दिवशी मालवण तालुक्यातील मसुरे-आंगणेवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्प, तसेच मालोंड-मालडी येथील कोल्हापूर पाटबंधारे प्रकल्प यांचे भूमीपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मृद अन् जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्यासह अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,

१. कोकणावर माझे प्रेम आहे आणि म्हणूनच मी गेल्या वर्षी श्री भराडीदेवीच्या दर्शनाला आलो होतो, तेव्हा कोकणातील योजना आणि व्यथा यांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असतांना कोरोना आला आणि सगळे ठप्प झाले. असे असले, तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच ! माझा कोकण संपन्न झाला पाहिजे. त्यासाठी जे करता येईल ते करण्याचे वचन श्री भराडीदेवीच्या साक्षीने मी कोकणवासियांना देतो.

२. आज आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोना संकटाचा सामना करत आहोत. आपण सगळे सहकार्य करत आहात, म्हणूनच कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकू.

३. कोकणात पाऊस भरपूर पडतो, पूर येतो, अतीवृष्टी होते; मात्र सगळे पाणी वाहून समुद्राला मिळते. अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरडे जाते. मग चर्चा होऊन अनेक योजना पुढे येतात; पण खासदार अरविंद सावंत आणि खासदार विनायक राऊत यांनी या योजना पुढे आणल्या. त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला, हे महत्त्वाचे आहे.

कोरोनाचे संकट नष्ट करून कोकणसह महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे !

या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्री भराडीमातेला वंदन केले आणि कोरोनाचे संकट नष्ट करून कोकणसह महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, अशी प्रार्थना केली. ‘कोरोनामुळे आंगणेवाडीच्या जत्रेत गर्दी करू नका’, या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याविषयी भाविकांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा कण अन् कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी व्यय होऊ दे’, असा आशीर्वाद त्यांनी श्री भराडीमातेकडे मागितला. श्री भराडीमातेची कृपा म्हणून इतकी वर्षे रखडलेल्या या योजना आज मार्गी लागत आहेत. याचा निश्‍चित आनंद आहे.