कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार पालखी सोहळ्यासह इतर धार्मिक कार्यक्रम रहित
अक्कलकोट, ३ मार्च (वार्ता.) – २८ फेब्रुवारी या दिवशी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा उत्सव पुष्कळ भक्तीभावात; परंतु अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत आणि पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार पालखी सोहळ्यासह इतर धार्मिक कार्यक्रम रहित केले.
सकाळी ८.३० वाजता पारंपरिक देवस्थानचे लघुरूद्र करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला. सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा आणि गुरुप्रतिपदेनिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रहित करण्यात आले.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता मंदिरातील महाराजांची नित्य पूजा, आरती वगळता सर्व धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या वतीने होणारे पूजा-विधी अजूनही बंदच आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत असल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून त्याचा परिणाम येथील वटवृक्ष मंदिरातील भाविकांच्या गर्दीवर झाल्याने प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांची संख्या अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले.