श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

श्रीमती शिरीन चाइना

१. आशीर्वाद देणार्‍या योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे दर्शन होणे, त्यांच्या हातातील तुपाचा दिवा आकाशात प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसणे, ‘तो ब्रह्मांडालाच प्रदक्षिणा घालत असावा’, असे वाटणे आणि यातून ‘मी सनातनच्या साधकांच्या समवेत नेहमीच आहे’, असे योगतज्ञ दादाजी सांगत असल्याचे जाणवणे

‘२५.११.२०१९ या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी डोळे मिटून श्रीकृष्णाचा नामजप करत होते. त्या वेळी मला ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन हात उंचावून आशीर्वाद देत आहेत’, असे दिसले. त्यानंतर त्यांच्या हातात तुपाचा दिवा दिसला. तो दिवा तरंगत वर वर आकाशात जात होता. तो दिवा आकाशात प्रदक्षिणा घालत असतांना ‘प्रदक्षिणेची कक्षा रुंदावत जाऊन तो संपूर्ण ब्रह्मांडालाच प्रदक्षिणा घालत असावा’, असे वाटले. या अनुभूतीद्वारे ‘मी सनातनच्या साधकांच्या समवेत नेहमीच आहे’, असे योगतज्ञ दादाजी सांगत असल्याचे मला जाणवले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्या हातातील दिव्याच्या ज्योतीने साधिकेच्या हृदयातील दिवा (आत्मज्योत) पेटवत असल्याचे दिसणे आणि त्या वेळी पुष्कळ भावजागृती होणे

३.१२.२०१९ या दिवशी मी डोळे मिटलेले असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातात दिवा असून त्यातील ज्योतीने ते माझ्या हृदयातील दिवा (आत्मज्योत) पेटवत आहेत’, असे दृश्य मला दिसले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातातील ज्योत सुंदर आणि पिवळ्या रंगाची होती अन् ती माझ्या अनाहतचक्राकडून आज्ञाचक्राकडे जात होती. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होऊन माझ्या हातावर रोमांच आलेे.

३. ‘स्वतःचे कपाळ म्हणजे आगाशी असून परात्पर गुरु डॉ. आठवले त्या आगाशीचे द्वार उघडून बाहेर पहात आहेत’, असे दृश्य दिसणे

६.१२.२०१९ या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे डोळे मिटून नामजप करतांना ‘माझे कपाळ म्हणजेे आगाशी असून परात्पर गुरु डॉक्टर त्या आगाशीचे द्वार उघडून बाहेर पहात आहेत’, असे दृश्य मला दिसले. ‘माझा भाव अल्प झाला असता अथवा मी भावविहीन झाले असता या दृश्याच्या केवळ स्मरणानेच माझा भाव जागृत होऊन मी भावस्थितीत राहू शकेन’, असे माझ्या लक्षात आले.

४. १५.१२.२०१९ या दिवशी डोळे मिटून जप करतांना आलेल्या अनुभूती

अ. श्री गणेशाला मी माझा आध्यात्मिक भाऊ मानतेे. तो मला अत्यंत प्रिय आहे. आज तो सूक्ष्मातून आपल्या सोंडेने माझ्या डोक्यावर हळुवारपणे पाणी शिंपडत होता. असे करतांना ‘पाण्याने केवळ माझे डोके ओले व्हावे; पण कपडे भिजू नयेत’, याची काळजी तो घेत होता. गणेशाच्या या प्रेमळ कृतीने मी अत्यंत भारावून गेले.

आ. मला रथात बसून आलेल्या सूर्यदेवाचे दर्शन झाले. ‘त्याने माझ्या कपाळातून माझ्या शरिरात प्रवेश केला आहे’, असे मला जाणवले. देवाच्याच कृपेमुळे कपाळाच्या आतील भागात मला सूर्यदेवाचे सौम्य रूपातील अस्तित्व अनुभवता आले.

इ. त्यानंतर ‘डोक्यावर ओढणी आणि पायांत चांदीचे सुंदर पैंजण असलेली बालरूपातील देवी ध्यानमंदिरात प्रवेश करत आहे’, असे दृश्य मला दिसले. मला तिचे मुख स्पष्ट दिसले नाही; परंतु ‘ती दुर्गामाता असावी’, असे वाटले.

ई. ‘माझ्या डोक्याच्या पुष्कळ वर अधांतरी गुलाबी रंगाचे एक कमळ चक्राकार फिरत असून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताप्रमाणे ते कमळ आपल्या तर्जनीवर धारण केले आहे’, असे दृश्य मला दिसले.

उ. शेवटी ‘माझ्या कपाळाच्या भागात चांगल्या आणि अनिष्ट शक्ती यांचा सूक्ष्म लढा चालू आहे’, असे दृश्य मला दिसले. अनिष्ट शक्ती लांब आणि अणकूचीदार सुयांद्वारे आक्रमण करत होत्या अन् चांगल्या शक्ती प्रतीआक्रमण करून अनिष्ट शक्तींची शक्ती नष्ट करत होत्या, तसेच त्यांचा नेम चुकवत त्या सुयांची अग्रे तोडून टाकत होत्या.

५. कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माझी सर्व प्रकारे काळजी घेत आहेत’, याची जाणीव मला वरील अनुभूतींतून झाली. अशा या गुरुमाऊलीच्या चरणी मी संपूर्ण शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते. सर्व साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे गुरुदेव त्यांच्यासाठी जे करत आहेत, त्याला तोड नाही. त्यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच ठरेल. मी गुरुदेवांच्या चरणी मानस साष्टांग नमस्कार घालत आहे आणि ‘तो त्यांच्यापर्यंत पोचेल’, याची मला निश्‍चिती आहे.’

– श्रीमती शिरीन चाइना, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०१९)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक