शोकप्रस्तावानंतर कामकाज स्थगित
जनतेपुढे असंख्य समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी सभागृहातील प्रत्येक क्षण कसा वापरता येईल, याचा विचार न करता सोयीनुसार कामकाज चालवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
मुंबई, १ मार्च (वार्ता.) – कोरोनाच्या भीतीमुळे केवळ ८ दिवस होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात कोणतीही प्रश्नोत्तरे न होता, केवळ पहिल्या दिवसाच्या कामाच्या औपचारिकतेनंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. विधान परिषदेचे कामकाज जेमतेम २० मिनिटे, तर विधानसभेचे कामकाज जेमतेम ४० मिनिटे झाले. आधीच सर्वांत अल्प कालावधीच्या या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस कोणतेही कामकाज न होताच गेला.
सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधीमंडळाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर २० मिनिटांच्या विश्रांतीनंतर विधानसभेचे, तर ४० मिनिटांच्या विश्रांतीनंतर विधान परिषदेचे कामकाज चालू झाले. दोन्ही सभागृहांत ‘वन्दे मातरम्’ने प्रारंभ झाला. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय, राज्यपालांच्या भाषणाची प्रत पटलावर ठेवणे, अभिभाषणावरील आभाराचा प्रस्ताव आणि अनुमोदन, अध्यादेश पटलावर ठेवणे, पुरवणी मागण्या सादर करणे, राज्यपालांची संमत केलेल्या विधेयकांचे वाचन, तालिका सभापतींच्या नावे घोषित करणे आणि शोकप्रस्ताव सादर करणे आदी पहिल्या दिवसाच्या कामकाजाची औपचारिकता पार पाडून कामकाज स्थगित करण्यात आले.