जपानमध्ये वाढत्या आत्महत्यांमुळे एकाकीपणावर मात करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना !

जीवनाचा उद्देश शाश्‍वत अशा आनंदाची प्राप्ती करून घेणे असतांना जपानसारख्या अत्यंत प्रगत अशा वैज्ञानिक देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे लागते, याचा विचार भारतातील तथाकथित विज्ञानवाद्यांनी आणि वैज्ञानिक जाणीवांसारखे कार्यक्रम राबवणार्‍यांनी केला पाहिजे !

टोकियो (जपान) – कोरोना महामारीमुळे वर्ष २०२० मध्ये जपानमध्ये अनेक नागरिकांनी एकाकीपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या. जवळपास ११ वर्षांनंतर आत्महत्येच्या प्रकरणांची मोठ्या प्रमाणावर नोंद करण्यात आली. त्यानंतर आता जपान सरकारने ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस’ (एकाकीपणा मंत्रालय) नावाचे मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून लोकांच्या एकाकीपणावर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे खाते पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या अखत्यारीत असणार आहेे.

जपानमध्ये आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. वर्ष २०१६ मध्ये आत्महत्यांमुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या प्रत्येकी एक लाख नागरिकांमागे १८ इतकी होती. जागतिक पातळीवर आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण प्रत्येकी १ लाख नागरिकांमागे १० इतके होते. वर्ष २०१९ मध्ये जपानमध्ये २० सहस्र जणांनी आत्महत्या केली होती. ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत ऑक्टोबर २०२० या मासात महिलांच्या आत्महत्या दरात ८३ टक्क्यांनी वाढ झाली, तर पुरुषांमध्ये २२ टक्के वाढ झाली होती.