पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २६ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने शहर आणि परिसरातील २८ परिवार देवतांची मंदिरे वर्ष २०१५ मध्ये कह्यात घेतली आहेत. यातील ५ परिवार देवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार आणि श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपाचे सुशोभिकरण या कामांचे भूमीपूजन २५ फेब्रुवारी या दिवशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
परिवार देवतांच्या मंदिरांचे संवर्धन करण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या वतीने श्री. प्रदीप देशपांडे यांची ‘आर्किटेक्ट’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार श्री. देशपांडे यांनी परिवार देवतांच्या मंदिरांचे बांधकाम करण्यासाठी आराखडा आणि अंदाजपत्रक सिद्ध करून दिले आहे.