महाशिवरात्रीच्या औचित्याने पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील साधकांसाठी ‘ऑनलाईन महाशिवरात्री शिबिर’
पुणे – भगवान शिव लयाची देवता आहे. आपण सर्वांनी भगवान शिवाला आपल्यामधील नकारार्थी विचारांचा लय होण्यासाठी प्रार्थना करूया. आपल्यातील दोष आणि अहं नष्ट होण्यासाठी शिवकृपेची आवश्यकता आहे. सर्वांनी महाशिवरात्रीपर्यंत साधनेची घडी बसवण्याचे ध्येय घेऊया. प्रत्येक सेवा करतांना ‘आपण शिवाला बिल्वपत्र अर्पण करत आहोत’, असाही भाव ठेवू शकतो. या महाशिवरात्रीच्या पर्वकाळात भावाच्या स्तरावर साधना करून शिवाची कृपा संपादन करूया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना केले. येत्या ११ मार्चला असलेल्या महाशिवरात्रीच्या औचित्याने पश्चिम महाराष्ट्र, तसेच गोवा येथील साधकांसाठी नुकतेच ‘ऑनलाईन महाशिवरात्री शिबिर’ घेण्यात आले. त्या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सर्वांना व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपस्थितांनी शिबिरामध्ये भगवान शिवाचे अस्तित्व अनुभवले.
शिबिराचा प्रारंभ प्रार्थना, भावार्चना अन् भगवान शिवाच्या आरतीने झाला. आरती झाल्यानंतर महाशिवरात्रीनिमित्ताने प्रसाराची व्याप्ती आणि तळमळीने प्रयत्न कसे करावेत ? याविषयी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष सेवा करतांना, तसेच ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी कोरोनाविषयक पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची दक्षता यांची सविस्तर माहितीही देण्यात आली. या वेळी साधकांना ‘सेवेतील प्रत्येक कृती करतांना आपण कोणता भाव जोडू शकतो ?’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच ग्रंथांची माहिती प्रभावीपणे कशी मांडावी ? याविषयीही अवगत करण्यात आले. शिबिराची सांगता कृतज्ञतागीताने झाली. या चैतन्यमय ‘ऑनलाईन’ महाशिवरात्री शिबिराचे सूत्रसंचालन कु. वैभवी भोवर यांनी केले.