महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाची तत्कालीन पोलीस महासंचालकांना नोटीस

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा कारागृहात छळ केल्याचा आरोप

मुंबई – भोपाळ (मध्यप्रदेश) येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा कारागृहात अमानुष छळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने राज्याच्या तत्कालीन पोलीस महासंचालकांना नोटीस पाठवली आहे. या नोटिसीमध्ये तत्कालीन पोलीस महासंचालकांना ६ एप्रिलपर्यंत आयोगापुढे उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक घायाळ झाले होते. सध्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. या खटल्यात आरोपींवर लावण्यात आलेला ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) हटवण्यात आला आहे. या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांनी कारागृहात असतांना आंतकवादविरोधी पथकाकडून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे वर्ष २०१८ मध्ये एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यावरून अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना ही नोटीस पाठवली आहे.