घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांसंबंधी विचारणा करण्याचा अधिकार आहे ! – सुधीर मुनगंटीवार, नेते, भाजप

सुधीर मुनगंटीवार, नेते, भाजप

नागपूर – राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याविषयी राज्यशासनाला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, असे मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. विधानसभा अध्यक्षांची निवड लवकर झाली, तर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवणे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले होते. त्यानंतर महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आगामी काळात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात शासनाला नुकतेच विचारले आहे.