सूर्यदेवा, तू दिलेल्या दृष्टीने सारी सृष्टी पहावी ।
अन् तुझ्या चरणी भावसुमनांजली वहावी ॥
सूर्योदयाने उजळतो आसमंत ।
तो दिव्यत्वाचे रूप असे मूर्तिमंत ॥
हे सूर्यनारायणा भगवंत ।
तू जगावरी करतसे कृपा अनंत ॥ १ ॥
तुझ्या तेजाने दिसती प्रभातीचे सुरेख रंग ।
सारथी अरुणाला लाभला तुझा सुसंग ॥
तुझ्या कृपेने प्रफुल्लित होते विश्वाचे अंतरंग ।
अन् आमच्या मनात उमटतात इंद्रधनुषी भावतरंग ॥ २ ॥
अग्निहोत्राने करतो सूर्यवंदना ।
तुझ्या अस्तित्वाने सर्वांना मिळते नवचेतना ॥
सूर्यनमस्कार घालून करतो बलोपासना ।
तुझ्याकडून मिळतसे सर्वांना स्वकर्तव्याची प्रेरणा ॥ ३ ॥
शनिदेव, यमदेव आणि अश्विनीकुमार ।
तापी आणि यमुना पुत्रींसह तुझा परिवार ॥
तुझा संपूर्ण परिवार असे कर्तबगार ।
तत्त्वनिष्ठतेने करती कर्तव्ये पार ॥ ४ ॥
डोळ्यांना दृष्टी देणारे तुझे रूप असे अर्यमा ।
ईश्वराचे नेत्र असती सूर्य आणि चंद्रमा ॥
सूर्याच्या तेजाने झळाळते आकाशाची निलीमा ।
मावळतीच्या वेळी दिसते सूर्याची लालीमा ॥ ५ ॥
तुझी नामे असती अर्यमा आणि त्रिवस्वान ।
रोगनिवारण करतोस तू अंशुमान ॥
मोक्षापेक्षा कर्तव्य करतसे सृष्टीनियमना ॥
नमन असे आमचे महान सूर्यनारायणा ॥ ६ ॥
सूर्यदेवा रथसप्तमीच्या या शुभदिनी ।
निरांजनाच्या ज्योतीने तुला ओवाळूनी ॥
कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही मनापासूनी ।
आरोग्य अन् सौख्य लाभो आमुच्या जीवनी ॥ ७ ॥
भानु, मित्र, भास्कर आणि रवि ।
तुझी रूपे पहाण्यासाठी तुझीच कृपा हवी ॥
तू दिलेल्या दृष्टीने सारी सृष्टी पहावी ।
अन् तुझ्या पावन चरणी भावसुमनांजली वहावी ॥ ८ ॥
धर्मसंस्थापना करण्याची आली वेळा ।
म्हणुनी पृथ्वीवर अवतरला श्रीमन्ननारायणा ॥
हिंदु राष्ट्र स्थापन करण्या ।
बल दे आम्हा हे सूर्यनारायणा ॥ ९ ॥
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |