इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १६ फेब्रुवारी – गत काही वर्षांपासून काही युवक ‘व्हॅलेंटाईन डे’च्या अनिष्ट प्रकारास बळी पडत आहेत. महाविद्यालय परिसरातही एकतर्फी प्रेमाचे बळजोरीचे प्रकार आढळून येतात. यामुळे अनेक युवती-महिला याला बळी पडत आहेत. तरी भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला आळा घालण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न व्हावेत, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात अन् अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना देण्यात आले.
प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कॉफी शॉप’ नावाचा नवा प्रकार इचलकरंजी परिसरात नव्याने उदयास आला आहे. पोलिसांच्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला. याचे मूळ ‘व्हॅलेंटाईन डे’मध्येच आहे. तरी अशा प्रकारच्या ‘कॉफी शॉप’ला आळा घालावा. या वेळी बजरंग दलाचे संयोजक श्री. संतोष हत्तीकर, सर्वश्री पंढरीनाथ ठाणेकर, प्रवीण सामंत, बाळासाहेब ओझा, रणजित पवार, दत्ता पाटील, मुकेश दायमा, संतोष मुरदंडे, जितेंद्र मस्कर, सागर कोले यांसह अन्य उपस्थित होते.