‘राज्य राखीव पोलीस दल (बल)’ आणि तेथे चालणारे अपप्रकार !

७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण संरक्षणविषयक ‘सुरक्षा दल’ म्हणजे काय ?, ‘राज्य राखीव पोलीस दला’ची रचना, ‘राज्य राखीव पोलीस दला’चे काम यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.

सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक

४. अन्य काही सूत्रे

४ अ. ‘राज्य राखीव पोलीस दला’चा ‘खाकी धर्म’! : ‘राज्य राखीव पोलीस दला’चे प्रशिक्षण घेणार्‍या एका अधिकार्‍याने आम्हाला सांगितले होते, ‘‘आमचा कुठलाच धर्म नाही. आमचा धर्म एकच आहे आणि तो म्हणजे ‘खाकी धर्म’ !’’

४ आ. पुष्कळ वेळ मिळत असणे : ‘राज्य राखीव पोलीस दला’मध्ये बुद्धी कुठेच चालवायची नसल्याने प्रत्येकाजवळ पुष्कळ वेळ असतो. या वेळेचा उपयोग ते साधनेसाठी सहज करू शकतात. काही जण देव, धर्म आणि अध्यात्म यांविषयी ऐकून घेण्यास उत्सुकही असतात.

४ इ. जिल्हा आणि ग्रामीण पोलिसांप्रमाणे ‘राज्य राखीव पोलीस दला’ला पैसे खाता न येणे : जिल्हा आणि ग्रामीण पोलीस समाजामध्ये राहून जसे पैसे खातात, तसे ‘राज्य राखीव पोलीस दला’मध्ये पैसे खाता येत नाहीत; म्हणून काही अधिकारी कर्मचार्‍यांच्या पैशांवर लक्ष ठेवून असतात. ‘राज्य राखीव पोलीस दला’चा समाजातील लोकांशी मुळीच संपर्क नसतो. त्यामुळे शक्यतो ‘राज्य राखीव पोलीस दला’च्या कर्मचार्‍यांना जिल्हा आणि ग्रामीण पोलीस यांच्याप्रमाणे जनतेला लुबाडून पैसे खाता येत नाहीत. ‘राज्य राखीव पोलीस दला’चे कर्मचारी स्वतःची तुलना जिल्हा आणि ग्रामीण पोलिसांच्या समवेत करतात. ते म्हणतात, ‘‘जिल्हा आणि ग्रामीण पोलीस काम (ड्युटी) करून पैसे खाऊन कुटुंबामध्ये जातात. त्याप्रमाणे आम्हाला काहीच जमत नाही.’’

५. पैसे खाता येत नसले, तरी अन्य प्रकारे अनीतीने वागणे

५ अ. वेळेचा अपव्यय करणे

१. ‘राज्य राखीव पोलीस दला’मध्ये नोकरी करतांना आम्हाला पुष्कळ मोकळा वेळ असतो. या मोकळ्या वेळेचा उपयोग ते लोक ‘पत्ते खेळणे, जुगार खेळणे, दारू पिणे, मांसाहारी पदार्थ बनवून खाणे’, यांसाठी करतात.

२. नक्षलग्रस्त भागात वेगवेगळे खेळ खेळणे, उदा. व्हॉलीबॉल, कॅरम, क्रिकेट इत्यादी.

३. सुरक्षा सेवेच्या ठिकाणी काहीच काम नसल्याने आणि तेथे केवळ कामावर (ड्युटीवर) उपस्थित रहावे लागत असल्याने येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तींकडे निरखून पहाणे होते.

४. ‘भ्रमणभाषवर खेळ खेळत रहाणे’, हेच काम सर्रास सर्व जण करतात.

५ आ. वासनांधता असणे : ‘राज्य राखीव पोलीस दला’ला सतत बाहेरचा बंदोबस्त असल्याने कुटुंबापासून नेहमीच दूर राहावे लागते. त्यामुळे ते लोक पुष्कळ त्रस्त असतात. ‘राज्य राखीव पोलीस दला’मध्ये वासनांध वृत्तीचे पुष्कळ लोक मला आढळून आले.

५ इ. असा चालतो भ्रष्टाचार !

५ इ १. कर्मचार्‍यांची सुट्टीसाठी अडवणूक करणे : ‘एखाद्या कर्मचार्‍याची सुटीवर जाण्यासाठी अडवणूक करणे, त्याच्याकडून पैशांची अपेक्षा करणे, त्याच्याकडून पैसे घेणे, त्याला ‘मांसाहारी पदार्थ आणि दारू दे’, असे म्हणणे’, असे वाईट अनुभवही येतात.

५ इ २. विनामूल्य किंवा अल्प मूल्याच्या वस्तूंचे अधिक मूल्य दाखवणे : ‘राज्य राखीव पोलीस दला’मध्ये सर्व तुकड्यांचे स्वतःचे भोजनगृह (मेस) असते. त्यामध्येही भ्रष्टाचार चालतो. ‘तुकडीच्या ‘पीआय’साठी (प्रमुखासाठी) वेगवेगळ्या भाज्या बनवणे, त्यांना दारू अन् मांसाहार देणे आणि त्याचे पैसे लोकांकडून वसूल करणे, न्यूनतम मूल्याच्या वस्तू आणून त्यांचे अधिक मूल्य दाखवणे’, असे सर्व प्रकार चालतात. त्यामुळे त्यांना वरिष्ठांकडून ‘नोकरीमध्ये सवलत मिळणे, अधिक दिवस सुटी मिळणे’ अशा सवलती मिळतात. हे सर्व ‘पीआय’च्या अंतर्गत अधिकाराने होऊ शकते. हा भ्रष्टाचार इतरांच्या लक्षात येतो; पण त्यासंदर्भात कुणी काही बोलत नाही.

५ इ ३. बांधकामाच्या संदर्भात जुन्या वस्तू नवीन असल्याचे दाखवून त्यांचे नवीन वस्तूंनुसार मूल्य घेणे : ‘राज्य राखीव पोलीस दला’मध्ये जुने बांधकाम पाडून नवीन काही बांधायचे असेल, तर तेथेही भ्रष्टाचार चालतो. ‘जुन्या वस्तू रंग देऊन वेल्डिंग करून आणणे आणि ‘नवीन आणली’, असे दाखवून त्याचे पैसे घेणे’, असे सर्रास चालू असते. ‘दगड-माती इत्यादी न विचारताच घेऊन येणे, म्हणजे थोडक्यात चोरून आणणे’, असेही होते. ‘बर्‍याच गोष्टी विनामूल्य किंवा अल्प मूल्यात मिळवणे आणि त्यांच्या पूर्ण मूल्याचा अहवाल शासनाला देणे’, असेही केले जाते.

५ इ ४. अधिकार्‍यांच्या पातळीवरून भ्रष्टाचार होणे आणि एखाद्याने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला वेगवेगळ्या युक्त्या वापरून दाबले जाणे : मी शासनाला दिला जाणारा अहवाल प्रत्यक्षात बघितलेला नाही. त्यामुळे ‘त्यात कसा आणि किती भ्रष्टाचार होतो ?’, हे मला सांगता येणार नाही. असा भ्रष्टाचार समादेशक (कमांडंट), साहाय्यक समादेशक, प्रत्येक तुकडीचे ‘पीआय’ या अधिकार्‍यांच्या पातळीवरूनच होतो. यामध्ये सर्व कर्मचारीही सामील असतात. हे सर्व जण खायला घालतात; म्हणून हे अधिकारी खातात. एखाद्याने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला वेगवेगळ्या युक्त्या वापरून दाबले जाते, उदा. ‘रिपोर्ट कोर्स’ला पाठवणे इत्यादी. (समाप्त)
– एक साधक (११.१०.२०१९)

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !

पोलीस-प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे.

पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर
द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल : [email protected]

‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी वा अपकीर्ती करण्याचा उद्देश नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा व्हावी’, हा उद्देश आहे. – संपादक