रामनाथी (गोवा) – मूळ रत्नागिरी येथील सनातनच्या ९९ व्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्या पार्थिवावर ११ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १ वाजता फोंडा (गोवा) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी १० फेब्रुवारी २०२१ या दिवशी दुपारी १२.५० वाजता फोंडा निवासस्थानी देहत्याग केला होता. पू. (श्रीमती) लोटलीकरआजी यांचे ज्येष्ठ पुत्र आणि सनातनचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विजय लोटलीकर यांनी पू. आजींच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला.
पू. लोटलीकरआजी यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. ‘पू. आजींच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर अग्नीच्या ज्वाळांचा रंग लालसर दिसत होता.’ – कु. प्रियांका लोटलीकर (पू. आजींची नात), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. ‘पू. आजींच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या बाजूने अनुमाने २ मिनिटे १ ते दीड फूट उंचीचा पिवळसर रंगाचा धनुष्याच्या आकाराचा द्रवपदार्थाचा फवारा येत होता. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी ‘असे आम्ही प्रथमच पहात आहोत’, असे सांगितले, तसेच आम्हीही आतापर्यंत प्रथमच असे पाहिले.’
– श्री. विजय लोटलीकर (पू. आजींचे पुत्र) आणि श्री. अभिनय लोटलीकर (पू. आजींचा नातू), फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |