जमावाने उद्ध्वस्त केलेले मंदिर पाक सरकारने बांधावे ! – पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सरकारकडून मंदिराच्या बांधकामासाठी ३० सहस्र ४१ कोटी रुपयांची तरतूद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यातील तेरी गावामध्ये ३० डिसेंबर या दिवशी हिंदूंच्या एका मंदिराची धर्मांधांच्या जमावाने तोडफोड करत आग लावली होती. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेत सुनावणी करत मंदिराचे बांधकाम पुन्हा करण्याचा आदेश पाक सरकारला दिला आहे. पुढील २ आठवड्यांत मंदिर बांधण्याचा आदेश देत याविषयी ‘एव्हेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ला मंदिराविषयीची सर्व माहिती सादर करण्याचा आदेश दिला आहे. जमीयत उलेमा ए इस्लाम पार्टी (फजल उर रहमान गट) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरावर आक्रमण केले होते.

१. न्यायालयाने आदेशात म्हटले की, मंदिर बांधण्याचा व्यय मंदिर पाडणार्‍यांकडून वसूल करण्यात यावा.

२. न्यायालयाने या घटनेच्या प्रकरणी किती जणांना अटक केली ?, असा प्रश्‍नही सरकारला विचारला.

३. या वेळी ईटीपीबीचे अधिवक्ता इकराम चौधरी यांनी म्हटले की, आतापर्यंत ही वसुली झालेली नाही. सरकारने मंदिराच्या बांधकामासाठी ३० सहस्र ४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सौजन्य : WION