किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांना राष्ट्रीय स्मारक घोषित करा !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राजमुद्रेची प्रतिकृती भेट देतांना छत्रपती उदयनराजे भोसले (डावीकडे)

सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. विशेषतः किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या किल्ल्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे आणि त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची त्यांच्या देहली येथील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी छत्रपती उदयनराजे भोसलेे यांनी उपराष्ट्रपती नायडू यांना राजमुद्रेची प्रतिकृती भेट म्हणून दिली. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा आणि सातारा जिल्ह्याचे इतिहासातील महत्त्व यांविषयी माहिती सांगितली.