आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले यांना रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेल्या धनुष्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मी मी नामजप करण्यासाठी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा मला त्रास होत असल्यामुळे नामजप करतांना माझे मन एकाग्र होत नव्हते. त्या वेळी मी सहजच ध्यानमंदिरातील पद्मनाभस्वामी मंदिरातून ओणमनिमित्त प्रसादस्वरूपात प्राप्त झालेल्या शेषशायी विष्णूच्या धनुष्याकडे पाहून नामजप करू लागले.

१. ध्यानमंदिरातील शेषशायी विष्णूच्या धनुष्याकडे पाहून नामजप केल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. ‘ॐ निसर्गदेवो भव ।’ असे म्हणतांना माझे धनुष्यातील सर्वार्ंत वरच्या ओळीतील सूर्य-चंद्रासह नवग्रहांकडे लक्ष गेले.

आ. ‘वेदम् प्रमाणम्’ असे म्हणतांना माझे नारद आणि चार वेद श्रीमन्नारायणाजवळ उभे असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित झाले.

सौ. कस्तुरी भोसले

इ. ‘हरि ॐ जयमे जयम्’ असे म्हणतांना माझी दृष्टी शेषशायी नारायणावरून फिरून त्याच्या चरणांजवळ उभ्या असलेल्या विष्णुभक्त गरुड-हनुमंत यांच्याकडे गेली.

ई. ‘जय गुरुदेव’ असे म्हणतांना ‘श्रीन्नारायणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या श्रीदेवी-भूदेवी, म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, द्वारपाल म्हणजे जय-विजय यांच्यासह नवग्रह, नारद, वेद आणि समयांमधील ज्योती, असे संपूर्ण ब्रह्मांड जयघोष करत आहे’, असे जाणवून माझी भावजागृती झाली अन् माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला.

उ. त्यानंतर मी नामजप करण्यासाठी आश्रमात कुठेही बसले, तरी मला त्या धनुष्याचे स्मरण होऊन ‘माझा नामजप श्रीहरीच्या चरणी अर्पण होत आहे’, असे मला जाणवते. ‘महर्षींनी असे धनुष्य रामनाथी आश्रमात पाठवून ते त्यांनी सांगितलेला नामजप माझ्याकडून भावपूर्ण करवून घेत आहेत’, याविषयी मी महर्षि आणि श्रीमन्नारायणाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

२. ध्यानमंदिरातील दुसर्‍या धनुष्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

२ अ. ध्यानमंदिरात दुसरे धनुष्य ठेवले होते. त्यात दशावतारांपैकी श्रीरामाच्या जीवनातील प्रसंग रेखाटलेले पाहून ‘ते चित्र काढणारा नक्कीच रामभक्त असणार’, याची मला निश्‍चिती वाटते.

२ आ. मध्यभागी सिंहासनारूढ श्रीराम आणि सीता असून त्यांची दास्यभक्ती करणारे हनुमान अन् शत्रुघ्न आहेत.

२ इ. सिंहासनाच्या एका बाजूला श्रीरामाने अहिल्योद्धार केलेला प्रसंग असून त्यामध्येे श्रीरामाच्या समवेत सगुण सेवेची परिसीमा असणारा लक्ष्मण आणि विश्‍वामित्रऋषि दाखवले आहेत.

२ ई. सिंहासनाच्या दुसर्‍या बाजूला ‘श्रीरामाची निर्गुुण सेवा करणारा भरत अयोध्येच्या सिंहासनावर श्रीरामाच्या चरणपादुका ठेवून एखाद्या विश्‍वस्तासारखा राज्यकारभार सांभाळत आहे’, असे दाखवले आहे.

२ उ. धनुष्याकडे पहातांना ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप एकाग्रतेने होणे : ‘धनुष्याच्या एवढ्याशा जागेत श्रीरामासह सीता, विश्‍वामित्र आणि अवतारी बंधूची शिष्यभावात सेवा करणारे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासह हनुमान यांचे महत्त्वाचे प्रसंग अत्यंत कुशाग्र बुद्धीने निवडले आहेत’, याची प्रचीती येते. या धनुष्याकडे पहात माझा ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप एकाग्रतेने होतो.

२ ऊ. हनुमंतासारखी दास्यभक्ती निर्माण होण्यासाठी साधिकेने श्री गुरूंना केलेली प्रार्थना ! : साधकांच्या ‘भावजागृतीला पोषक आणि व्यष्टी-समष्टी नामजप करवून घेणारे’ असे सुंदर आणि चपखल प्रसंग चितारलेली दोन धनुष्ये ध्यानमंदिरात ठेवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्यावर केवढी कृपा केली आहे, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. ‘त्यांनी हनुमंतासारखी दास्यभक्ती माझ्यामध्ये निर्माण करावी’, अशी मी त्यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१७)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक