गोद्वेष आणि गो-फिनाईल !

मध्यप्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी गोमूत्रापासून बनवलेल्या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार, असे तेथे सत्तेत असलेल्या भाजप सरकारने निश्‍चित केले आहे. यामुळे काँग्रेसचे पित्त खवळले आहे. ‘योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि’ आस्थापनाला लाभ मिळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे’, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. पूर्वी काँग्रेस केंद्रात सत्तेत असल्यापासून योगऋषी रामदेवबाबा यांना पाण्यात पहात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वर्ष २०१४ च्या आधीपासून रामदेवबाबा यांनी उघडपणे तत्कालीन काँग्रेस सरकार करत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण्यास आरंभ केला. त्यांच्या विविध योगशिबिरांमध्ये ते भारतीय संस्कृती आणि तिच्या अधःपतनास कारणीभूत असलेले घटक यांविषयी बोलत अन् लोकांना जागृत करत. त्या काळात काँग्रेसच्या विरोधात जी लाट निर्माण झाली, त्यात रामदेवबाबा यांनी केलेली जागृतीही कारणीभूत आहे. त्यामुळे रामदेवबाबा आणि त्यांचे ‘पतंजलि’ आस्थापन यांवर काँग्रेस वारंवार टीका करतांना दिसते. पूर्वी काँग्रेस सत्तेत असतांना ‘पतंजलि’ आणि रामदेवबाबा यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला, तसेच पतंजलीच्या उत्पादनांविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या; मात्र रामदेवबाबांनी या सर्वच प्रसंगांना धीराने तोंड देऊन पुढे मार्गक्रमण केले. असो. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती, ‘गो-फिनाईल’ या कीटकनाशक उत्पादनाची. अन्य रासायनिक कीटकनाशकांपेक्षा हे गोमूत्रापासून बनवले गेले आहे, हे त्याचे वैशिष्ट्य. गोमूत्रामध्ये अनेक गुण आहेत आणि त्याचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर ‘गो-फिनाईल’ ही संकल्पना पुढे आली आहे; मात्र ‘धर्मनिरपेक्षतावादी’ काँग्रेस गोमातेचा द्वेष करत असल्यामुळे पारंपरिक पद्धतीला अनुसरून ‘गो-फिनाईल’ वगैरे उत्पादन सिद्ध केल्यास तिला ते रूचत नाही. काँग्रेस विविध राज्यांमध्ये, तसेच केंद्रात सत्तेत असतांना अशा पारंपरिक पद्धतींना तिने प्रोत्साहन का दिले नाही ? भारतात ‘गरिबी, बेकारी आहे’, असे नेहमीच सांगितले जाते. ‘गो-फिनाईल’सारख्या उत्पादनांच्या निर्मितीमुळे बेरोजगारांनाही काम मिळेल आणि लोकांचे आरोग्यही सुधारेल. असे असतांनाही काँग्रेस त्याला विरोध करते; कारण हिंदुद्वेष. गोमाता, गोसेवा आदी गायींशी निगडित कुठलाही विषय पुढे आल्यास काँग्रेसला तो नकोसा वाटतो; कारण तिला गोहत्या होणे, यात चुकीचे असे काही वाटत नाही. भारतातील विविध राज्यांमध्ये गोहत्याबंदी कायदा झाला; मात्र त्याला विरोध करण्यात काँग्रेसने धन्यता मानली; कारण तिला हिंदूंच्या धार्मिक भावनांशी काही देणेघेणे नाही; मात्र मुसलमानांची मते आपल्यापासून लांब जाणार नाहीत ना, याची काळजी आहे. गो-फिनाईलच्या विरोधात वरकरणी ‘पतंजलि’ आस्थापन असल्याचे दिसत असले, तरी मूळ कारण हे गोद्वेष आणि त्याहून अधिक हिंदुद्वेष हेच आहे. आता हिंदूंनीही सतर्क रहाणे आवश्यक आहे. काँग्रेससारख्या पक्षामुळे स्वातंत्र्यानंतर हिंदूंची बरीच हानी झाली. आताही हिंदूंना भेडसावणार्‍या बर्‍याच समस्यांच्या मागे काँग्रेसच आहेे.