सावंतवाडी तालुक्यातील माजगांव येथील श्री सातेरीदेवीचा जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजगांव, सावंतवाडी येथील श्री सातेरीदेवी महिषासुरमर्दिनीचा वार्षिक जत्रोत्सव पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा २९ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. या सातेरीदेवी महिषासुरमर्दिनी अन् देव रवळनाथ आणि परिवार पंचायतन देवतांचा हा उत्सव माहेरवाशिणींचा उत्सव म्हणूनही ओळखला जातो. यानिमित्त देवीची, तसेच देवस्थानची माहिती देत आहोत.

संकलक : श्री. सीताराम म्हापणकर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.

श्री सातेरीदेवी

देवतेचे रूप

महिषासुरमर्दिनी असलेल्या श्री सातेरीदेवीचे मंदिर सावंतवाडी शहरानजीक माजगाव येथे निसर्गरम्य परिसरात आहे. मंदिराला १५० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक ज्या आकेरी तालुक्यातील कारागिरांनी घडवले, त्याच कारागिरांनी देवीची देखणी मूर्ती घडवली आहे. या देवीच्या एका हातात ढाल, दुसर्‍या हातात त्रिशूळ, तिसर्‍या हातात तलवार असून चौथ्या हातात महिषासुराचे मुंडके, अशी उग्ररूप धारण केलेली मूर्ती सजवल्यानंतर अधिकच तेजस्वी दिसते. जत्रोत्सवानिमित्त देवी सजते, तेव्हा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. नक्षीदार चांदीचा मुकुट, कानात सोन्याची कुडी, नथ आणि गळ्यात सोन्याचा हार, असा साजशृंगार असतो.

परिवार देवता

मूर्तीची पूनर्प्रतिष्ठापना वर्ष २००० मध्ये झाली. देवीच्या बाजूलाच १२ पंचायतन देवता पूर्वापार आहेत. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव वेतोबा, श्री म्हारिंगण यांची मंदिरे, तर उजव्या बाजूला श्री देव बाराचा चव्हाटा आहे. मंदिराच्या अगदी समोर दीपमाळ, रंगमंच, अशी मंदिराची आकर्षक रचना नजरेत भरते. महिषासुरमर्दिनी असली, तरी श्री सातेरीदेवी जत्रोत्सवाला मायमाऊलीच्या रूपात दर्शन देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जत्रोत्सवाचा प्रारंभ पारंपरिक पद्धतीने श्री महादेव मंदिरापासून होतो.

श्री सातेरीदेवी मंदिर

गावची शैक्षणिक वाटचाल श्री सातेरीदेवीच्या छत्रछायेखाली झाल्याचे सांगितले जाते. श्री सातेरीदेवीच्या मंदिरात पूर्वी शाळा भरत असे. बहुसंख्य भाविकांची कित्येक घराणी देवीच्या चरणांसमोर नतमस्तक होत आहेत. खणा-नारळाने देवीची ओटी भरणे म्हणजे माहेरवाशिणींसाठी अपूर्व पर्वणी असते. श्री सातेरी रवळनाथ परिवार पंचायतन मानकरी आणि देवस्थान समिती यांच्या वतीने गुढीपाडवा, रामनवमी, श्री महादेवाचा वाढदिवस, भजनी सप्ताह, नारळी पौर्णिमा, घटस्थापना, दसरा, नरकचतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, महादेव जत्रोत्सव, सातेरी वाढदिवस, होळीपूजन, तुलशीविवाह आदी सण प्रतिवर्षी साजरे केले जातात. नवरात्रोत्सवात नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरे केले जातात. प्रत्येक दिवस एका एका वाडीला दिलेला असतो. त्यात सांस्कतिक कार्यक्रम साजरे करण्याची स्पर्धाच लागलेली असते. अष्टमीच्या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसाद दिला जातो.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जत्रोत्सव साध्या पद्धतीने कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.