त्या वेळी बाळाच्या आईने तत्परतेने सांगितले, अगं, मान सांभाळ हं. त्याच्या मानेखाली हात ठेव. तिचे हे सांगणे योग्यच होते; कारण त्या साधिकेला बाळ घेण्याची सवय नाही, असे त्या मातेच्या मनात येणे साहजिकच होते. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले.
१. मान याविषयी आलेले विचार !
अ. बाळाची लहानपणी मान सांभाळावी लागते. तेव्हा त्याला कशाविषयी मान-अपमान नसतो.
आ. ते मोठे झाल्यावर (वय मोठे झाल्यावर) किंवा त्याला अधिकार प्राप्त झाल्यावर त्याचा मान सांभाळावा लागतो.
इ. आपल्या मनाविरुद्ध काही घडले, तर आपले मन आणि मान दुखावतो.
ई. आपल्या मनासारखे कुणी काही केले, तर आपले मन आणि मान उंचावतो अन् सुखावतो.
उ. आपल्याकडून काही विपरीत घटना घडली, तर आपली मान खाली जाते.
ऊ. माझा मुलगा आणि सून विदेशात गेल्यावर तो फॉरिन रिटर्नआहे, हे सांगतांना आई-वडिलांची मान उंचावते.
ए. मुलाला इंग्रजी माध्यमाच्या (कॉन्व्हेंट) शाळेत घालणे किंवा प्रवेश मिळाल्यावर तो त्याचा मान आहे, असे त्या कुटुंबाला वाटते.
ऐ. मुलगा अनुतीर्ण झाल्यावर पालकांचा मान पुष्कळ दुखावतो.
ओ. शुभकार्यात आपल्याला योग्य तो मान मिळाल्यावर आपण सुखावतो; परंतु मान न मिळाल्यास आपला अपमान होतो.
औ. आजपर्यंत मी मानाने जगले आहे, असे आपण अभिमानाने सांगत असतो.
अं. मला माझ्या नातेवाईक आणि सहपरिवार यांत मान आहे, हे आपण मानाने सांगत असतो.
२. मानाचा मनावर करून घ्यायचा योग्य संस्कार !
अ. मानामुळे साधनेची हानी होणे आणि त्यासाठी मनोलय आवश्यक असणे : मानाचे असे अनेक प्रकार माझ्या मनात तरळले, तरी ते मनाला दिसत नाहीत. त्या मानामुळे आपण साधनेची किती हानी करून घेतो ! साधनेत या मानाचा, म्हणजेच मनोलय करायचा असतो. आपण जेवढा मनोलय करू, तेवढे आपण देवाच्या सान्निध्यात राहू. संत ज्ञानेश्वरांचा समाजातील सर्वांनी अपमान केला, तरी ते स्थिरच होते.
आ. संतांनी मनाच्या भूमीत मशागत करून नामाचे बी रोपण करणे आणि ती भूमी अध्यात्माने सुजलाम् सुफलाम् कशी होईल ?, याकडे त्यांचे लक्ष असणे : संत एकनाथ यांची परीक्षा घेण्यासाठी एक माणूस त्यांच्या अंगावर अनेक वेळा थुंकला, तरी संत एकनाथ यांनी न चिडता कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाले, तुझ्यामुळे मला अनेक वेळा गंगास्नान करायला मिळाले. संतांचे मन राखल्यामुळे आपल्या मनोलयाला आरंभ होतो; परंतु आपण मी संतसेवा करतो, असा मान बाळगला, तर ती संतसेवा होतच नाही. संत मनोलय करतात आणि त्या मनाच्या भूमीत मशागत करून नामाचे बी रोपण करतात आणि ती भूमी अध्यात्माने सुजलाम् सुफलाम् कशी होईल ? याकडे त्यांचे बारीक लक्ष असते.
इ. साधकांच्या मनोभूमीत येणारा अहंचा वास प्रथम संतांनाच येतो; म्हणूनच परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधकाला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करायला सांगतात अन् प्रत्येक साधकाच्या मनाची भूमी नांगरत असतात. ते साधकांच्या मनात असलेले अहं आणि स्वभावदोष यांचे तण काढून टाकतात.
ई. परात्पर गुरु डॉक्टरच साधकांच्या मनाची आध्यात्मिक मशागत करवून घेणार असणे : ही भूमी एकदाच नांगरून चालत नाही, तर शेतकर्याच्या हाती पीक लागण्यासाठी त्याला प्रतिवर्षी शेताची मशागत करावी लागते, तसेच आपल्याला या मनाची आध्यात्मिक मशागत करून ईश्वरप्राप्ती करायची आहे. परात्पर गुरुदेव प्रत्येक साधकाकडून ही मशागत करवून घेणारच आहेत; परंतु त्यासाठी प्रत्येक साधकाचा गुणानुसार क्रमांक येणे आवश्यक आहे.
उ. परात्पर गुरुदेवांना केलेली प्रार्थना ! : परात्पर गुरुदेव, तुम्हीच माझ्या मनोभूमीत नामाचे बीज पेरले आहे. आता त्यातील तण तुम्हीच काढून टाका आणि या बिजाची वाढ चांगली होऊन नामाचे पीक उत्तम येऊ द्या. सर्व साधकांची मने स्वच्छ, शुद्ध आणि सात्त्विक होऊ देत, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.
– श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम,रामनाथी, गोवा. (२.१२.२०१८)