बेळगाव – महापालिकेसमोर लावण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज हटवला, तर रक्तपात होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणावी; अन्यथा १५ दिवसांनंतर तीव्र आंदोलन करू, अशी पोकळ चेतावणी कन्नड संघटनेचा नेता नागराज वाटाळ याने दिली आहे. कित्तूर चन्नम्मा चौकात येऊन वाटाळ यांनी २४ जानेवारी या दिवशी हे वक्तव्य केले. वाटाळ यांच्या वक्तव्यावरून बेळगावातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही वाटाळ यांनी याचप्रकारे चिथावणी देणारी वक्तव्ये केली आहेत. (देशात आपण कायद्याचे राज्य आहे, असे एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे नागराज वाटाळ यांच्यासारखे थेट कायदा हातात घेण्याची भाषा करतात ! समाजात फूट पाडणारी अशाप्रकारे वक्तव्ये करणार्यांवर प्रशासनाने योग्य वेळी कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)
बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृतरीत्या लाल पिवळा झेंडा लावल्यानंतर बेळगावसह समस्त सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २१ जानेवारी या दिवशी होणारा मोर्चा स्थगित करण्यात आला; मात्र त्याच दिवशी शिवसेनेने तीव्र निदर्शने केली. या संदर्भात प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.