वर्षाला १५ लाख रुपये वेतन घेणार्‍या सनदी लेखापाल पायल शहा संन्यास घेऊन जैन साध्वी बनणार !

  • कुठे लाखो रुपयांचे वेतन असलेली नोकरी सोडून ईश्‍वरप्राप्तीसाठी संन्यास घेणारी जैन तरुणी, तर कुठे नोकरी आणि व्यवसाय करतांनाही ईश्‍वरप्राप्तीसाठी काहीही न करणारे जन्महिंदू !
  • पैशांद्वारे शाश्‍वत आनंद घेता येत नाही, हे ज्याच्या लक्षात येते तोच अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि पुढे ईश्‍वर त्याचे जन्मभर योगक्षेमं वहातो !
पायल शहा

कर्णावती (गुजरात) – मुंबईत एका मोठ्या आस्थापनात सनदी लेखापाल (चार्टंड अकाऊंटंट) म्हणून वार्षिक १५ लाख रुपये वेतन घेणार्‍या ३१ वर्षीय जैन धर्मीय पायल शहा यांनी संन्यास दीक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ फेब्रुवारीला सुरतमध्ये होणार्‍या एका समारंभात त्या ही दीक्षा घेऊन लौकिक जीवनाचा त्याग करणार आहेत. पायल शहा सनदी लेखापालाच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर अग्रक्रमांकाने  उत्तीर्ण झाल्या होत्या. पूज्य साध्वीजी प्राशमलोचनाश्रीजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी साध्वी बनण्याचे निश्‍चित केले.

पायल शहा यांनी म्हटले, ‘७ वर्षांपूर्वी जेव्हा मी माझ्या घराजवळ रहाणार्‍या साध्वींच्या घरी जायला लागले, तेव्हाच माझा प्रवास खर्‍या अर्थाने चालू झाला. ‘एकही दिवस सुट्टी न घेता, भ्रमणभाषसंचाचा वापरही न करता या साध्वी किती आनंदात आहेत’, हे पाहून मी आश्‍चर्यचकित झाले. यानंतर मी त्या साध्वींसमवेत रहायला लागले. मी त्यांच्यासमवेत वर्षभर तरी रहायलाच हवे, तेव्हाच माझा अंतर्गत प्रवास प्रारंभ होईल.’