‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डावीकडून उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

सिंधुदुर्ग – ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर अली जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान करून धर्मभावना  दुखावून जातीय द्वेष पसरवण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर तात्काळ बंदी घालावी, तसेच यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मंत्री शहा आणि जावडेकर यांना देण्यासाठीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना दिले. या वेळी समितीचे सर्वश्री गजानन मुंज, सुरेश दाभोळकर, रामकृष्ण कुलकर्णी आणि रवींद्र परब उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, या वेब सिरीजमध्ये अभिनेते सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद जीशान अय्यूब आणि गौहर खान यांच्या भूमिका आहेत. यामध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्या विषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे, तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला आहे आणि देशविरोधी घटकांचे उदात्तीकरणही करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येतेे. पोलीस कसे चुकीचे आहेत आणि देशविरोधी विद्यार्थी कसे निष्पाप आहेत, असे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यमान सरकार, पोलीस-प्रशासन आणि पंतप्रधान हे शेतकरी, मुसलमान अन् दलित विरोधी असल्याचे दाखवून त्यांच्या विरोधात जातीय विद्वेष आणि हिंसेची भावना प्रसारित केली आहे. एकूणच देशाचा सामाजिक सलोखा, एकता, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था यांना धोका निर्माण होऊ शकतो. या वेब सिरीजच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी आंदोलनेही चालू झाली आहेत. काही ठिकाणी गुन्हेही नोंद झाले आहेत.