राष्ट्रीयीकृत बँकांनी मराठीतून व्यवहार करण्याची सावंतवाडी येथील प्रांताधिकार्‍यांची सूचना

सावंतवाडी – मराठी पत्रकारदिनानिमित्त मनसेच्या वतीने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना बँकांमध्ये मराठीचा वापर करण्याविषयी निवेदन दिले होते. याची नोंद घेत येथील प्रांताधिकारी खांडेकर यांनी ‘सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांचे व्यवहार मराठीतून करावेत’, अशी सूचना सावंतवाडी तालुक्यातील सर्व बँक कार्यालयांना पत्राद्वारे दिली आहे.

मनसेच्या वतीने प्रांताधिकारी खांडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बँकांचे अधिकारी आणि काही संस्थांचे अधिकारी परप्रांतातील असून त्यांना मराठी बोलता येत नाही. त्यामुळे ते हिंदी भाषेचा वापर संभाषणात करत आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे असे अधिकारी आणि कर्मचारी यांना मराठीत बोलण्याची सक्ती करावी अन्यथा त्यांचे मोठ्या शहरात स्थानांतर करावे, तसेच असे अधिकारी आणि कर्मचारी यांना मराठी शिकवण्यास मनसे सिद्ध असल्याचेही म्हटले होते.